Parabhani: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील गंभीर जखमी चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:57 IST2026-01-12T14:56:53+5:302026-01-12T14:57:56+5:30
जिंतूरमध्ये मागील दोन महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी जवळपास २० ते ३० बालकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या.

Parabhani: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील गंभीर जखमी चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू
जिंतूर (जि. परभणी) : शहरातील हिदायतनगर भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुनेसा तौफिक कुरेशी (९ महिने) या चिमुकलीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २१ डिसेंबरला घडली होती.
शहरातील हिदायतनगर वसाहतीमधील जुनेसा तौफिक कुरेशी (९ महिने) व शेख रिजवान शेख हुसेन, सय्यद तैमूर सय्यद फेरोज ही तीन बालके २१ डिसेंबरला सायंकाळी घरासमोरील रस्त्यावर खेळत होते. दरम्यान, परिसरातील भटक्या कुत्र्यांनी या बालकांवर हल्ला केला. यात तिघेही गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी जुनैशा कुरेशी हिची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.
घोड्याचाही बालकावर हल्ला
शहरातील गजानन नगरात सिराज संजय नागरे या बालकावर घोड्याने हल्ला केल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दरम्यान, जिंतूरमध्ये मागील दोन महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी जवळपास २० ते ३० बालकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या. मात्र, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.