Parabhani: गंगाखेड पालिकेच्या लेखा विभागात राडा; बिलावरून वादातून खुर्च्या, काचा फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:11 IST2025-09-30T16:10:36+5:302025-09-30T16:11:50+5:30
गंगाखेड पालिकेत चाललंय काय? लेखापालाशी वादानंतर केबीनची तोडफोड झाल्याने खळबळ

Parabhani: गंगाखेड पालिकेच्या लेखा विभागात राडा; बिलावरून वादातून खुर्च्या, काचा फोडल्या
- प्रमोद साळवे
गंगाखेड ( परभणी) : येथील नगर पालिकेतील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शहरवासीयांच्या अनेक तक्रारी आहेत. यातच मंगळवारी (दि.३०) सकाळी ११ ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कामाचे बिल काढण्यासंदर्भाने वाद झाल्याची घटना घडली. या वादातून केबिनच्या काचेची, खुर्च्या व पाण्याच्या जारची तोडफोड झाल्याच्या घटनेने पालिका क्षेत्रासह शहरात खळबळ माजली आहे.
मंगळवारी सकाळी ११ ते ११:३० च्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांची जुनी केबिन असलेल्या व सध्याच्या लेखा विभागाशी संबंधित केबिनमध्ये लेखापाल (अकाउंटंट) शिवम धुत हे शासकीय कामकाज करत बसले होते. यावेळी प्राप्त माहितीनुसार केबिनमध्ये आलेल्या नागरिकाचा अधिकाऱ्यांशी कामाच्या बिलासाठी शाब्दिक वाद झाला. याचे पर्यावसनात संतप्त झालेल्या नागरिकाने संबंधित केबिनच्या काचेची तेथील खुर्च्यां व पाण्याचा जार फोडल्याने कार्यालयात मोठा गोंधळ उडाला.
दरम्यान, पालिका लेखा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादावादी व केबिनच्या तोडफोडी प्रकारानंतरही दुपारी ३:३० वाजेपर्यंत यासंदर्भात पालिकेकडून कुठलीही तक्रार दाखल झालेली नव्हती. या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत असल्याचे सांगत अधिकची प्रतिक्रिया दिली नाही.