Parabhani: पूर ओसरला, धोका कायम; घराची सफाई करताना सर्पदंशाने महिलेची मृत्यूशी झुंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:53 IST2025-10-03T16:52:42+5:302025-10-03T16:53:32+5:30
पुर ओसारल्यानंतर घराची साफसफाई करताना महिलेवर बेतला जीवघेणा प्रसंग; पाथरी तालुक्यातील मंजरथ येथील घटना

Parabhani: पूर ओसरला, धोका कायम; घराची सफाई करताना सर्पदंशाने महिलेची मृत्यूशी झुंज!
पाथरी : गोदावरी नदीला जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे आलेल्या महापुराने पाथरी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांचे जनजीवन विस्कळीत केले. घरात पुराचे पाणी शिरल्याने स्थलांतर झालेली मंजरथ येथील महिला पूर ओसरल्यानंतर गावी परतली. मात्र, संकट आणखी दूर झाले नव्हते. घराची साफसफाई करताना सर्पदंश झाल्याने महिला मृत्यूशी झुंज देत आहे. शारदा एकनाथ पांचाळ ( ५५) असे महिलेचे नाव असून ही घटना १ ऑक्टोबर रोजी घडली.
पूर ओसरल्यानंतर अशा घटना घडणे ही अपवादात्मक बाब नाही. घरात साचलेले गाळ, कचरा आणि ओलसर वातावरण यामुळे विंचू, साप, कीटक यांचा वावर वाढतो. तसेच दूषित पाणी, सडलेले अन्नधान्य व कचऱ्यामुळे पोटाचे विकार, विषाणूजन्य रोग, डेंग्यू-मलेरिया यांचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, पूरग्रस्त भागात प्रशासनाने नियमित आरोग्य तपासण्या, औषध फवारणी, तसेच जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे. मात्र, मंजरथ येथील घटनेने दाखवून दिले की, प्रत्यक्षात ग्रामस्थांवरच सर्व जबाबदारी ढकलली जाते. सरकार व स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पूरानंतरचे आरोग्य धोके गांभीर्याने न घेतल्यास अशा घटना वारंवार घडू शकतात.
महिलेची मृत्यूशी झुंज
सर्पदंश झाला तेव्हा शारदा पांचाळ यांच्या लक्षात आले नाही. मात्र, पहाटे अस्वस्थ झाल्यानतर त्यांना साप चावल्याचे लक्षण दिसून आली. त्यानंतर त्यांना तातडीने माजलगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या शारदा पांचाळ यांच्यावर माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती अत्यवस्थ आहे.
ग्रामस्थ, शिवसेनेकडून तातडीने मदत
या महिला भूमिहीन असल्याने उपचारासाठी तातडीने पैशांची सोय करणे कठीण ठरले. यावेळी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन निधी गोळा केला आणि तिच्या उपचाराची सोय केली. मात्र, प्रशासनाला या घटनेची अद्याप माहितीही नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मंजरथ येथील महिलेला सर्प दंश झाल्याची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे पाथरी विधानसभा प्रमुख एकनाथ घाडगे पदाधिकारी यांनी तातडीने उपचारासाठी आर्थिक मदत दिली.