Parabhani: पाच महिने अत्याचार! मजूर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी गप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:53 IST2025-10-16T12:53:35+5:302025-10-16T12:53:54+5:30
मुलीच्या पोटात सतत दुखायचे, तपासणी केली अन् अत्याचाराचा प्रकार उघड

Parabhani: पाच महिने अत्याचार! मजूर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलगी गप्प
पूर्णा (जि. परभणी) : मुलीच्या पोटात सतत दुखत असल्याने तिला दवाखान्यात उपचारासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात नेले होते. यामध्ये मंगळवारी तपासणी केली असता, अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकाराबाबत मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर अत्याचारासह जीवे मारण्याची धमकी दिल्याने २३ वर्षीय युवकाविरुद्ध मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून विविध कलमांन्वये बुधवारी गुन्हा दाखल झाला.
याबाबत माहिती अशी, पूर्णा तालुक्यातील एका गावात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलीवर हा धक्कादायक प्रकार मागील पाच महिन्यांत घडल्याचे फिर्यादीत नमूद केले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना गावातील ओम बालाजी पुरी याने वेळोवेळी अल्पवयीन मुलीला, तू मला आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला, तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकतो, अशी धमकी दिली.
दरम्यान, मागील महिन्यात मुलीच्या पोटात दुखत असल्याने त्यावेळी तिला गावातील दवाखान्यात दाखवले असता, औषधोपचार करण्यात आले. मात्र, पुन्हा मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात मंगळवारी आणले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणीअंती मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यावर मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मुलीने घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर पूर्णा पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी ओम बालाजी पुरी याच्याविरुद्ध कलम ६५ (१), ६४ (२), (एम) ३५१ बीएनएससह कलम चार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या आदेशाने तपास सहायक पोलिस निरीक्षक शहारे करीत आहेत. यातील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.