जाते डोक्यात घालून भावाचा खून;आर्थिक वादातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 16:48 IST2019-11-28T16:44:11+5:302019-11-28T16:48:48+5:30

मागील दहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहारातून वाद

The murder of a brother in the dispute of property in Parabhani | जाते डोक्यात घालून भावाचा खून;आर्थिक वादातून कृत्य

जाते डोक्यात घालून भावाचा खून;आर्थिक वादातून कृत्य

चारठाणा/बामणी (जि. परभणी) : घरातील आर्थिक व्यवहारातून धाकट्या भावाने पांडुरंग विठ्ठल दुभडकर (३१) या मोठ्या भावाच्या डोक्यात जात्याचा दगड घालून खून केला. ही घटना जिंतूर तालुक्यातील कान्हा येथे घडली आहे़ पोलिसांनी आरोपी भाऊ नारायण विठ्ठल दुभडकर (२८) याला अटक केली आहे.

काही महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर पांडूरंग व त्यांचा लहान भाऊ नारायण यांच्यात मागील दहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता़ २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोघा भावांमध्ये याच वादातून बाचाबाची होऊन कडाक्याचे भांडण झाले. यात राग अनावर झाल्याने नारायण दुभडकर याने पांडुरंग दुभडकर याच्या डोक्यात जात्याचा दगड घातला़ डोक्यात घाव बसताच पांडुरंग दुभडकर याचा जागीच मृत्यू झाला़ हे कुटूंबिय आदिवासी समाजाचे असून गावापासून काही अंतरावर असलेल्या आखाड्यावर वास्तव्याला होते़

 या घटनेची माहिती समजताच बामणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी नारायण दुभडकर यास ताब्यात घेतले आहे़ रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविला होता़ या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता़ 

Web Title: The murder of a brother in the dispute of property in Parabhani