भूमाफीयांचा शासकीय जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न, गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:08 IST2025-10-22T16:07:31+5:302025-10-22T16:08:21+5:30
जि.प.प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पुढील प्रकार टळला

भूमाफीयांचा शासकीय जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न, गुन्हा नोंद
परभणी : शहरातील संभाजीनगर परिसरात विविध शासकीय कार्यालय, शाळा, इमारत असलेल्या जागेच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत मैदानामध्ये अतिक्रमण करण्याच्या प्रयत्न सोमवारी भूमाफीयांनी केला. ही बाब लक्षात येताच वेळीच जिल्हा परिषद प्रशासनाने अतिक्रमणाच्या प्रकाराबाबत गुन्हा नोंद करण्याची भूमिका घेतली. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध हा गुन्हा नोंद झाला असला तरी या पाठीमागे कोण आहे ? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसह यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे.
शिवाजीनगर आणि संभाजीनगर अशा दोन वसाहतीच्या मधील भागात नर्सरी मैदान आहे. अनेक वर्षांपासून हे नर्सरी मैदान ओसाड पडले आहे. समग्र शिक्षा अभियान, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय यासह काही शासकीय कार्यालयांच्या येथे इमारती आहेत. यात जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या पाठीमागील बाजूस आणि मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर सोमवारी खांब उभारण्यासाठी सिमेंट आणि इतर काही साहित्य आणले होते. त्यासाठी खड्डे सुद्धा केले होते. हे लक्षात येताच संबंधित यंत्रणेने याची माहिती घेत शहानिशा करून त्वरित गुन्हा नोंदविण्याची पावले उचलली आहेत. मात्र अशा शासकीय भूखंडावर डोळा ठेवून काहीजण तो खिशात घालण्यासाठी प्रयत्न चालवित आहेत. हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे. शहरातील जिल्हा परिषद तसेच महापालिका आणि इतर शासकीय विभागांच्या अशा मोठ्या जमिनी बळकवण्याचा होणारा प्रयत्न यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी रोखणे आवश्यक आहे.
अशी घडली घटना
परभणी शहरातील बहुविध प्रशालेच्या बाजुला शासकीय जागेत सोमवारी सकाळी सिमेंट पोल व रिकामी थैली व काही थैलीत गिट्टी टाकल्याचे पुढे आले. त्यानंतर याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथुर व प्राथमिक शिक्षणाधीकारी सुनील पोलास यांच्याशी चर्चा झाली.
नंतर शिक्षणाधिकारी पोलास यांनी गट शिक्षणधिकारी म्हणून या सदर्भात पत्र देऊन पोलीस ठाण्यात तक्रार देणेबाबत कळवले. शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांच्या आदेशानुसार ही तक्रार पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी सायंकाळी नवा मोंढा ठाण्यात त्यावरून फिर्याद दिली. यामध्ये नमूद केले की, परभणी शहरातील बहुविध प्रशालेच्या बाजुला शासकीय जागेत गट नंबर २९३ सोमवारी सकाळी सिमेंट पोल व रिकामी थैली व काही थैलीत गिट्टी टाकल्याचे पुढे आले. कोणीतरी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, अशा मजकुराची अज्ञाताविरूध्द तक्रार दिली, अशी माहिती परभणी पसचे गटशिक्षणाधिकारी उमेश
राऊत यांनी दिली.
अज्ञाताने जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. यामध्ये सदरील जागा कोणाच्या मालकीची आहे. याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून घेतल्यावर पुढील बाबी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
गट नंबर २९३ बद्दल यापूर्वीच वाद सुरू आहे. यामध्ये एका बड्या राजकीय हस्तीचा हात असल्याचे सांगितले जाते. ही जागा बळकावण्यासाठी आधी एका उपविभागीय अधिकाऱ्याला बदलून दुसऱ्याकडे प्रकरण चालवून हडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्या विरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण चालले. तेथेही शिक्षण विभागाची ही जमीन त्यांच्या ताब्यात असताना अपील फेटाळले गेले. विहित मुदतीत अपील केले नसल्याचा फटका बसल्याचे सांगितले जाते. आता विभागीय आयुक्तांकडे प्रकरण दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. आता ती उघड होऊ लागली आहे.