परभणी जिल्ह्यासाठी मिळणार जायकवाडीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:48 IST2019-01-09T00:48:31+5:302019-01-09T00:48:59+5:30
जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परभणी जिल्ह्यासाठी मिळणार जायकवाडीचे पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परभणी जिल्ह्याला सुरुवातीला जायकवाडी धरणातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली होती. त्यानंतर जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. यावर्षी परभणी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने या भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाथरी मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ हे तिन्ही तालुके गंभीर दुष्काळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत. जायकवाडीच्या पाथरी येथील उपविभागांतर्गत पाथरी आणि मानवत तालुक्याचा बराच भाग येतो. या भागात रबीची पेरणी झाली. या भागात पिण्याचे पाणी तसेच शेतकºयांच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता होती. जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यासाठी जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र मागे दोन महिन्यापासून कालवा सल्लागार समितीची बैठकच झाली नसल्याने जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रखडला होता. आ.मोहन फड यांनी शासनस्तरावर याबाबत लेखीपत्र देऊन मागणी केली होती. ८ जानेवारी रोजी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला आ.मोहन फड, माजीमंत्री राजेश टोपे, गेवराईचे आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आ.मोहन फड यांनी दिली. दरम्यान, पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने दुष्काळी भागात जायकवाडी धरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे कालवा सल्लागार समितीची बैठक लांबत असल्याने ‘जायकवाडीच्या पाण्याची अनिश्चितता कायम’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ३ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते.
दुष्काळी भागाला होणार फायदा
४परभणी जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे साठे आटले आहेत. पाणीपातळी खालावल्याने या भागात जायकवाडीच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याने या भागाला दिलासा मिळाला आहे.
-आ.मोहन फड, पाथरी