अतिवृष्टीने गंगाखेडनजीक रेल्वे ट्रॅकखालील जमीन खचली; मोठा अपघात टळला, चार एक्सप्रेस रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 22:20 IST2025-09-27T22:17:59+5:302025-09-27T22:20:42+5:30
गंगाखेड पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव (स्टेशन) परिसर दरम्यान रेल्वे ट्रॅकखाली भूस्खलन

अतिवृष्टीने गंगाखेडनजीक रेल्वे ट्रॅकखालील जमीन खचली; मोठा अपघात टळला, चार एक्सप्रेस रद्द
प्रमोद साळवे
गंगाखेड (जि.परभणी) : गंगाखेड तालुक्यासह परिसरात झालेल्या ढगफुटीचा परिणाम शनिवारी सायंकाळी ५ वाजता रेल्वे सेवेवर मोठ्या प्रमाणात झाला. गंगाखेड पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव (स्टेशन) परिसर दरम्यान रेल्वे ट्रॅकखाली भूस्खलन झाल्याने रेल्वे ट्रॅक दबल्याची गंभीर घटना घडली. दरम्यान, या घटनेने रेल्वे प्रशासनाला चार रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या तर नांदेड-पूर्णा- परभणी व मानवतकडून गुंटूर, पनवेल जाणाऱ्या रेल्वेवर परिणाम झाला.
याबाबतची अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी पाच वाजता गंगाखेड तालुका तसेच सोनपेठ भागातील अतिवृष्टीमुळे गंगाखेड पासून परळीकडे जाणाऱ्या महामार्गावर दहा किलोमीटर अंतरावर वडगाव (स्टेशन) परिसरात रेल्वे ट्रॅक खाली भूस्खलन झाले. रेल्वे ट्रॅक दबल्याची घटना घडली. घटनेनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अभिषेक रंजन व सुनील कुमार यांच्या पथकाने भूस्खलन झालेल्या ट्रॅक दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले. दरम्यान, रात्री ९:३० पर्यंत ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे परभणी-गंगाखेड- परळी वै. मार्गावरील अकोला- परळी (७७६१४) परळी- आदीलाबाद (७७६१५), परळी- पूर्णा (५७६५८), पूर्णा- परळी (५७६५७) या चार गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती गंगाखेडचे स्टेशन मास्तर प्रशांत साबळे यांनी लोकमतला दिली. तर निजामाबाद- पंढरपुर (११४१३), नांदेड- पनवेल (१७६१४), छत्रपती संभाजीनगर- गुंटूर या तीन रेल्वे उशिराने धावणार असल्याचीही माहिती प्राप्त झाली.ढगफुटी व अतिवृष्टीने अगोदरच त्रस्त झालेल्या मराठवाड्याला ही दुर्घटना मोठी मानली जात आहे. कारण छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, गंगाखेड, परळीसह लातूर मार्गावरून सायंकाळी रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. या घटनेने गंगाखेड रेल्वे स्थानकात नांदेड, गुंटूर, पुणे व मुंबई जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ झाली होती.
पूर्णा-परभणी, मानवत-परभणी दरम्यान थांबविल्या रेल्वे
छत्रपती संभाजीनगर येथून परभणी, परळी मार्गे गुंटूरला जाणारी दैनंदिन एक्सप्रेस रेल्वे सायंकाळी ६.३० च्या दरम्यान मानवत रोड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली होती तर नांदेड येथून पनवेलला जाणारी एक्सप्रेस परभणी-पूर्णा दरम्यान मिरखेल स्थानकावर थांबविण्यात आली होती. नांदेड-परभणी तर परभणी-सेलू-जालना या मार्गावर कुठेही रेल्वेची वाहतूक प्रभावित झाली नाही. पनवेल, गुंटूर एक्सप्रेस यासह काही रेल्वे मात्र परभणी ते परळी स्थानकादरम्यान शनिवारी रात्री विलंबाने धावल्या. तर अकोला-परळी ही रेल्वे पूर्णा स्थानकापर्यंतच चालविण्यात आली. आणि पूर्णा-परळी रेल्वेची सायंकाळची फेरी रद्द करण्यात आली. तर काही रेल्वे या परभणी-गंगाखेड दरम्यान पोखर्णी स्थानकावर थांबविल्या होत्या. यामुळे अनेक छोट्या स्थानकावर प्रवाशांचे सुविधेअभावी हाल झाले.