परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस; नदी-ओढ्यांना पाणी, तीन मार्गावरील वाहतूक ठप्प
By राजन मगरुळकर | Updated: September 26, 2023 14:40 IST2023-09-26T14:34:23+5:302023-09-26T14:40:19+5:30
परभणी शहरात सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस सुरु झाला.

परभणी जिल्ह्यात दमदार पाऊस; नदी-ओढ्यांना पाणी, तीन मार्गावरील वाहतूक ठप्प
परभणी : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून सर्वच तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यात सेलू आणि पाथरी तालुक्यात तीन मार्गावरील नदी-नाले-ओढ्याला पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प पडली होती. यात चारठाणा-वालूर, मोरेगाव-वालूर आणि पाथरी-आष्टी रस्त्यावरील किन्होळा गावाला जोडणाऱ्या मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने हे मार्ग दोन ते तीन तास बंद होते. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
परभणी शहरात सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळपासून पाऊस सुरु झाला. दूपारपर्यंत हा पाऊस जिल्ह्यात कायम होता. यात चारठाणा परिसरात मुसळधार तर झरी परिसरात रिमझिम पाऊस झाला. याशिवाय पूर्णा तालुक्यातील ताडकळस शिवारात चांगला पाऊस झाला. सेलू तालुक्यातील गोंडगे पिंपरी गावालगत असलेल्या नदीला पुर आल्याने मंगळवारी दूपारी दोन तास चारठाणा - वालूर रस्त्यावरील वाहतुक ठप्प होती. सेलू तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. मोरेगाव- वालूर रस्त्यावरील हातनुर गावाजवळील ओढयाला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच पाथरी-आष्टी रस्त्यावर किन्होळाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने सकाळी काही तास वाहतूक बंद होती.
निम्न दुधना प्रकल्पात दोन दलघमी पाण्याची आवक
जालना जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात एकूण दोन दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जूनपासून आजपर्यंत १७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत २६.६० टक्केच पाणीसाठा आहे. गतवर्षी याच वेळी प्रकल्पात ७४.८६ टक्के पाणी होते. यंदा आतापर्यंत ४६१ पर्जन्यमान झाले आहे. चार महिन्यात प्रकल्पात १७.३५४ दलघमी पाण्याची वाढ झाली आहे.