लाठीकाठीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 09:17 IST2025-10-20T09:17:36+5:302025-10-20T09:17:57+5:30
सहा आरोपींविरुद्ध गुन्हा, एक आरोपी अल्पवयीन, एक फरार

लाठीकाठीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क, जिंतूर (जि. परभणी) : प्रेमीयुगल आपसात गप्पा मारत बसलेले असताना युवकांच्या सहाजणांच्या टोळक्याने संबंधिताला लाठीकाठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच हजार रुपये घेत तिघांनी युवतीवर सामूहिक अत्याचार केला. शिवाय संबंधित घटनेचे चित्रणही केले. याप्रकरणी जिंतूर पोलिसात संबंधित सहाही आरोपींविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यात चारजणांना अटक केली असून एक जण फरार आहे व एक अल्पवयीन आहे. ही घटना दि. १४ ऑक्टोबरला दुपारी अकराच्या सुमारास घडली होती.
पीडित मुलीने १९ ऑक्टोबरला पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत पीडित मुलीने सांगितले की, मी आणि माझा मित्र मारुती खरात मंगळवारी दुपारी देवी संस्थान मंदिराच्या इटोली शिवारात झाडाखाली गप्पा मारत बसलो असताना तेथे दुचाकीवरून अनोळखी सहा इसमांनी लाठीकाठीचा धाक दाखवून तुमच्याकडे किती पैसे आहेत ते द्या असे म्हंटले, त्यापैकी एकाने बॅग हिसकावली तर दुसऱ्याने बॅग मधील पाच हजार रुपये काढून घेतले. शेषराव, करण व साबीर नावाच्या तीन मुलांनी माझ्यावर आळीपाळीने अत्याचार केला तर, मुन्ना नावाच्या मुलाने व्हिडीओ शूटिंग केली.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी करण दतराव बुरकुले, शेषराव दतराव शेवाळे, शेख साबीर शेख सत्तार, करण मोहिते व इतर दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी करण बुरकुले, शेषराव शेवाळे, शेख साबिर, मुन्ना टोपे यास पोलिसांनी अटक केली असून, करण मोहिते हा फरार आहे. एक आरोपी अल्पवयीन आहे का याची पडताळणी पोलिस यंत्रणा करीत आहे.
पोलिसांची सतर्कता
कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना पोलिसांनी स्वतःहून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती आधारे घटनेची पडताळणी करून आरोपीस ताब्यात घेऊन कार्यवाही केली, तर पीडितेचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
यात पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहायक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनी कार्यवाहीनंतर जिंतूर येथे भेट देऊन कार्यवाहीवर नियंत्रण ठेवत मार्गदर्शन केले.