पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद
By राजन मगरुळकर | Updated: September 28, 2025 18:18 IST2025-09-28T18:17:25+5:302025-09-28T18:18:34+5:30
मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी केले.

पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद
राजन मंगरुळकर, परभणी : मराठवाड्यातील पूर परिस्थिती अतिशय गंभीर असून, उभी पिके आडवी झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हे अत्यंत क्लेशदायक असून, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी संयम सोडू नये, अशी भावनिक साद रविवारी समाजमाध्यमाद्वारे व्हिडीओतून कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी घातली.
माझ्या परभणी जिल्ह्यातील गंभीर पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी मदतीसाठी दिलेल्या क्रमांकावर योग्य ती मदत करण्यासाठी मी प्रयत्न केला. मराठवाडा आणि परभणीतील नुकसानीबाबत ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी मदतीचा हात पुढे करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी केले.
परभणीतील रहिवासी असलेले मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांनी त्यांच्या अधिकृत हँडलर, फेसबुकवरून या पूरस्थितीबाबत सहवेदना व्यक्त केल्या. परभणी, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे मुंबईत राहून प्रत्यक्ष तिथे जाऊन मदत करता येत नसल्यामुळे तळमळीने मदत करण्यासाठी मी पुढाकार घेतला. माझा मराठवाडा, माझी परभणीसाठी जगभरात कुठेही, कोणत्याही मराठी व्यक्तीने तसेच कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी शेतकऱ्यांना पूर परिस्थितीचा सामना धैर्याने करता, यावा याकरिता आपल्या परीने मदत करण्यासाठी पुढे यावे, अशी भावनिक साद त्यांनी घातली.
पुढच्या वर्षी हेच पाणी साथ देईल...
पूर परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनो तुम्ही संयम सोडू नका, हे म्हणणे कठीण आहे, हे मला माहीत आहे; पण तरीही तुम्हाला आजच्या परिस्थितीतून पुढे जाताना या संकटाचा सामना धिराने करावा लागणार आहे. कोणीही जीवाचं बरं वाईट करू नका, तुम्ही असा टोकाचा निर्णय घेतल्यास आम्हाला हेच अन्न, पाणी गोड लागणार नाही. पुढच्या वर्षी हेच पाणी तुम्हाला नक्की साथ देईल, यावर्षी सारखा त्रास देणार नाही, असा विश्वास यावेळी कऱ्हाडे यांनी बोलून दाखविला. माझा मराठवाडा, माझी परभणीसाठी मी माझ्या परीने मदत केली, इतरांनीही पुढे यावे. जगात जर्मनी, भारतात परभणी ही ओळख आपल्याला कायम ठेवायची असल्याचे कऱ्हाडे यांनी बोलून दाखविले.
पूर परिस्थिती क्लेशदायक, शेतकऱ्यांनो संयम सोडू नका; अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांची समाजमाध्यमावर भावनिक साद. #MaharashtraRains#MaharashtraFloodspic.twitter.com/K4T3dTDAqU
— Lokmat (@lokmat) September 28, 2025