Five years rigorous imprisonment for teacher who molestes minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षे सक्तमजुरी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षे सक्तमजुरी

गंगाखेड: सोनपेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असतांना अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास दि. ३ डिसेंबर मंगळवार रोजी गंगाखेड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सोनपेठ तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असताना बालाजी दशरथ मुंडे या शिक्षकाने दि. ९ ऑगस्ट २०१६ पूर्वी शाळेत विनयभंग केला असल्याची माहिती नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरी आईला सांगितली, तसेच शाळेतील इतर काही मुलींचा ही या शिक्षकाने विनयभंग केल्याचे सांगितले होते. यानंतर मुलीच्या आईने दि. १० ऑगस्ट २०१६ रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग व बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचा तपास करणारे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांनी गुन्ह्याचा तपास करून गंगाखेड येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी या प्रकरणात झालेला युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणातील एकुण पाच साक्षीदारांची साक्ष तपासात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी शिक्षक बालाजी दशरथ मुंडे यास कलम ३५४ अ भा.द.वी. व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ मधील कलम ९ च, ९ क, ९ म, व १० या कलमान्वये पाच वर्षे सक्त मजुरी व सात हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. एस. डी. वाकोडकर व तत्कालीन सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. बी. एस. यादव यांनी जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. डी. यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. एस. बी. पौळ यांनी त्यांना सहकार्य केले.

Web Title: Five years rigorous imprisonment for teacher who molestes minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.