परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:57 IST2024-12-23T11:55:49+5:302024-12-23T11:57:07+5:30
संविधानांची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, तर तो वारंवार समाजाची माफी मागत आहे. मनोरुग्णाला कसे काय समजले की, आपण संविधानांची विटंबना केली.

परभणी कोंबिंग ऑपरेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: खा. चंद्रकांत हंडोरे
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान जे-जे अधिकारी, कर्मचारी सहभागी होते, त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रमुख तथा खा. चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते परभणी येथे वाकोडे व सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना, काही काळ छत्रपती संभाजीनगर शहरात थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी परभणी दंगलीप्रकरणी केलेली घोषणा आणि तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया याचा आढावा घेण्यात येणार असून, तो अहवाल राहुल गांधी यांच्याकडे सोपवणार असल्याचेही सांगितले. संविधानांची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत, तर तो वारंवार समाजाची माफी मागत आहे. मनोरुग्णाला कसे काय समजले की, आपण संविधानांची विटंबना केली, असा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.
मनुवादी संस्कृतीसाठी धडपड
भाजप, आरएसएसचा संविधान बदलणे हा ‘अजेंडा’ आहे. भाजप मनुवादी संस्कृती लादण्यासाठी धडपडत आहे. भाजपचा मनुवादी चेहरा सर्वांसमोर आल्याने ते विविध मार्गांनी दबाव बनवत हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे हंडोरे म्हणाले.
कारवाईतून इशारा
संविधानाच्या विटंबनेनंतर दलित समाज रस्त्यावर उतरला. हा विरोध मोडून काढण्यासाठी तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल केले. पोलिस कोठडीत तरुणांची हत्या केली. तुम्ही विरोध कराल, तर तुमचे असे हाल करू, जणू असा इशाराच या कारवाईच्या निमित्ताने दिल्याचे हंडोरे म्हणाले. पत्रकार परिषदेला दिनकर ओंकार, संतोष भिंगारे, राजू जाधव, भाऊसाहेब नवगिरे, शरद शिवतारे, संजय पटेकर, सुदाम सरोदे, कैलास जंबडे, प्रा. धनंजय रायबोले, शशिकांत बनसोडे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.