सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर भजन आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:36 IST2025-06-23T13:35:17+5:302025-06-23T13:36:24+5:30
प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी

सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर भजन आंदोलन
परभणी: राज्य शासनाच्या सौर कृषी पंप योजनेत पैसे भरूनही पंप न मिळाल्याने संतप्त झालेल्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालयासमोर भजन आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या सौरपंप वितरणातील विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.
परभणीचे पालकमंत्री हेच उर्जा खात्याचे राज्यमंत्री असतानाही स्थानिक पातळीवर योजनांची अंमलबजावणी ढिसाळपणे होत आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या मुख्य सौर कृषी पंप योजने अंतर्गत २५ टक्के रक्कम भरूनही ६ ते ८ महिन्यांपासून सौर पंपासाठी वाट पाहावी लागत आहे. २५,९६१ शेतकऱ्यांनी पैसे भरले असताना केवळ ४,७६१ शेतकऱ्यांनाच पंप मिळाले आहेत. त्यामुळे पैसे भरल्यानंतर ३० दिवसांच्या आत सौर कृषी पंप देणे बंधनकारक करावे,ज्या शेतकऱ्यांना अद्याप पंप मिळालेले नाहीत, त्यांना तात्काळ पंप वितरीत करण्यात यावेत.
प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, या मागण्यांसाठी सोमवारी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी शहरातील महावितरण कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भगवान शिंदे, केशव यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.