शेतकरी कन्येचे UPSC मध्ये यश; डॉ. रोमा तांबोळीची दिल्लीत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:52 IST2025-08-14T16:52:09+5:302025-08-14T16:52:09+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतलेल्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेत देशात १४ वा आणि महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक

शेतकरी कन्येचे UPSC मध्ये यश; डॉ. रोमा तांबोळीची दिल्लीत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती
- प्रमोद साळवे
गंगाखेड: तालुक्यातील राणीसावरगाव या छोट्याशा गावातून एक मोठी आणि प्रेरणादायी झेप घेत अवघ्या २७ व्या वर्षी डॉ. रोमा मुजमील तांबोळी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतलेल्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेत देशात १४ वा आणि महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे गाव, तालुका आणि जिल्ह्यात अभिमानाची भावना ओसंडून वाहत आहे.
डॉ. रोमा यांनी आपले प्राथमिक शिक्षण ग्रामीण पार्श्वभूमीत घेतले. पुढे बी.ए.एम.एस. शिक्षण नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या जगात आपली क्षमता आजमावण्याचा निर्धार त्यांनी केला आणि नागपूर येथे UPSC स्पर्धा परीक्षेची कठोर तयारी सुरू केली. यापूर्वी त्या एम.डी. अभ्यासक्रमासाठी पात्र ठरल्या होत्या, पण त्यांचे लक्ष्य मोठे होते. देशसेवेच्या माध्यमातून जनतेचे आरोग्य जपणारे पद मिळवणे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करत नवी दिल्ली येथील केंद्रीय सरकारी आस्थापना विभागात वर्ग-१ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे. बुधवारी दि.१३ रोजी सायंकाळी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात जडणघडण झालेली ही डॉक्टर आता देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आपली सेवा देणार आहे.
कुटुंबाचा संघर्ष आणि प्रेरणादायी यश
डॉ. रोमा या मुजमील सरवर तांबोळी यांच्या कन्या आहेत. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून साऊंड सर्व्हिसचा व्यवसाय करतात. सहा मुलींना उच्च शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला आणि त्यासाठी प्रत्येक संकटाशी सामना केला. आज त्या सहा मुलींमधील डॉ.सिफाना, डॉ.रोमा व डॉ.अर्शनाज या तीन मुली डॉक्टर, अंजुम ही बँक मॅनेजर, सुनेला ही केमिकल इंजिनीअर, धाकटी मुलगी सानिया ही बी.टेक. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मोठी मुलगी डॉ. शिफा तांबोळी एमबीबीएस, एमडी स्त्रीरोगतज्ज्ञ असून उमरगा (जि. धाराशिव) येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
मुलींसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ
गावाचे माजी सरपंच अल्ताफ सय्यद सांगतात की, "मुजमील तांबोळी यांनी मुलींना मुलांसारखेच नव्हे, तर त्याहूनही अधिक संधी दिल्या. त्यांच्या कष्टामुळे आज तांबोळी कुटुंबाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे." डॉ. रोमा तांबोळींचा हा प्रवास ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना एक नवा आत्मविश्वास देणारा आहे. मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर कोणतेही स्वप्न गाठता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या यशामुळे राणीसावरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे आणि अनेक मुलींना नव्या उंचीची स्वप्ने पाहण्याची हिंमत मिळाली आहे.