हसऱ्या लग्नाची, फसवी गोष्ट; बोगस लग्नाचा विस्तार मात्र चार जिल्ह्यांत; एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:20 IST2025-12-06T14:17:39+5:302025-12-06T14:20:01+5:30
कोल्हापूर-सोलापूर अन् लातूरच्या एजंटांकडून मोठी फसवणूक

हसऱ्या लग्नाची, फसवी गोष्ट; बोगस लग्नाचा विस्तार मात्र चार जिल्ह्यांत; एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा
परभणी : नवरदेव पुण्याचा, नवरी पालमची… लग्न जुळविले इचलकरंजीकरांनी, स्थळ दाखविले कोल्हापुरातल्या वधू-वर सुचकांनी, व्यवहार झाले लातूरकरांच्या उपस्थितीत आणि लग्न लावले परभणी जिल्ह्यातील केरवाडी येथे. या चार जिल्ह्यांत पसरलेली ही सर्व ‘जुळवाजुळवीचा’ शेवट अंबाजोगाईमध्ये झाला. आता पळून गेलेल्या नवरीसह चार जिल्ह्यातील नेटवर्क शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
ही घटना सिनेमातील प्रसंगाला साजेशी असली तरी घडली मात्र थेट वास्तवात. स्वारगेट, पुणे येथील किरण मोरे याचे लग्न जुळविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून या फसवणुकीची गुंतागुंत उघड झाली. मोरे कुटुंब दोन-तीन वर्षांपासून मुलगा किरणसाठी स्थळ शोधत होते. शेजाऱ्याच्या ओळखीतून इचलकरंजी येथील वधू-वर सुचक रंजना मोरे व जया कान्हेगावकर यांच्याशी संपर्क आला. काही स्थळे दाखविल्यानंतर रंजना हिने कोल्हापुरातील विनायक जाधव याचे नाव सांगितले. त्याच्याद्वारे सरला मधुकर कोलते नावाच्या मुलीचे फोटो, आधार कार्ड पाठवण्यात आले आणि स्थळ आवडले. एवढ्यावरून पुढे व्यवहारही सुरू झाले. सरलाच्या नातेवाईक म्हणून सांगोल्यातील नवनाथ बंडगीरे याची एंट्री झाली. त्याच्यासह विनायक जाधव, रंजना मोरे, जया कान्हेगावकर आणि लातूर जिल्ह्यातील रेखा सूर्यवंशी, तौफीक, बेबीजान शेख, बबन काकडे असे अनेक जण यात सामील असल्याचे पुढे स्पष्ट झाले. मुलगी गरीब असल्याने लग्नाचा खर्च १.५ लाख रुपये आणि प्रत्येकी एजंटांना १० हजार लागतील, अशी माहिती मोरे कुटुंबाला देण्यात आली. अखेर विचारांती विवाहाला सहमती देत पुण्यातून फोनपेवर २१ हजार टाकून सुरुवात झाली.
मुलगी पाहणीचा ‘टूर’ अन् केरवाडीत लग्न
२ डिसेंबरला रात्री कुटुंब इचलकरंजीकरांच्या सांगण्यावरून तुळजापूर- लातूर - पालम असा प्रवास करून पालममध्ये मुलगी सरला कोलते हिला पाहण्यासाठी गेले. मुलगी, तिची आई आणि मावस बहीण यांच्या उपस्थितीत पाहणी झाल्यानंतर पुढील दिवशी केरवाडी (ता. पालम) येथील मारोती मंदिरात साधे लग्न लावण्यात आले. लग्न संपताच नवनाथ बंडगीरे व विनायक जाधव यांनी पैशांची मागणी केली. कुटुंबाने २,१०,००० रुपये रोख आणि ८०,००० रुपये गुगल पेवरून दिले. एवढे देणे-घेणे झाल्यानंतर सर्वजण पुण्याच्या दिशेने निघाले.
अन् अंबाजोगाईत ‘क्लायमॅक्स’
अंबाजोगाईजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले असता नवरा किरण आणि त्याची आई ढाब्यात गेली. कारमध्ये मुलगी व शेजारी बसले होते. तेवढ्यात नवरी सरला आणि तिची मावस बहीण गाडीतून उतरून समोरच तयार उभ्या पांढऱ्या कारमध्ये बसल्या आणि काही क्षणांत गायब झाल्या. मोरे कुटुंब अवाक् झाले आणि तेव्हा कळले चार जिल्ह्यांत विखुरलेली ही ‘एजंटांची टोळी’ संगनमताने फसवणूक करत होती.
व्याप्तीने गुंता वाढला; ११ जणांविरुद्ध गुन्हे
या प्रकरणात चार जिल्ह्यांतील एकूण ११ जणांवर संगनमताने विवाहाच्या नावाखाली २.९० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पालम पोलिसांनी तपास सुरू केला असून या टोळीची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.