खळबळजनक ! तपासासाठी गेलेल्या पोलीसांवर जमावाचा हल्ला, पालम तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 11:47 IST2021-05-22T11:43:57+5:302021-05-22T11:47:03+5:30
कापसी येथे दोन गटात तुबंळ हाणामारी झाल्याचे घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस गेले होते.

खळबळजनक ! तपासासाठी गेलेल्या पोलीसांवर जमावाचा हल्ला, पालम तालुक्यातील घटना
पालम : तालुक्यातील कापसी येथे तक्रारींचा तपास करण्यासाठी गेलेल्या जमादारावर जमावाने प्राणघातक हल्ला करून पोलीसांचे वाहन तासभर अडवून ठेवल्याचा धक्कादायक घटना २१ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसात पहाटे च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू झाली आहे.
कापसी येथे दोन गटात तुबंळ हाणामारी झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी पोलीस पथक रात्री ८ च्या सुमारास तपासासाठी गेले होते. जमादार बलभीम पोले हे घटनास्थळी जाऊन साध्या वेशात तपास करीत होते. यावेळी जमावाने वाद घालून त्यांना काठीने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही माहिती समजताच उप निरीक्षक विनोद साने यांनी घटनास्थळ गाठून जखमी पोले यांना उपचारासाठी वाहनात सोबत घेतले. यानंतर आक्रमक जमावाने त्यांनाही धक्काबुकी करीत रस्त्यात आडवे झोपून पोलीस वाहन अडवले. यानंतर कसाबसा मार्ग काढीत पोलीसांनी पालम गाठले.
जखमी जमादार बलभीम पोले यांना ना़देड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन कडक कारवाई करण्याची सुचना दिली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या वरून ९ जनांविरोधात पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.