मृत्यूनंतरही डॉक्टरकीचा धर्म पाळला; डॉ.धनंजय काळेंच्या अवयवदानामुळे ६ जणांना 'नवजीवन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:14 IST2026-01-02T15:12:42+5:302026-01-02T15:14:50+5:30
माझा मुलगा गेला, पण इतरांच्या रूपात जगेल!"; काळे परिवाराच्या दातृत्वाला सलाम

मृत्यूनंतरही डॉक्टरकीचा धर्म पाळला; डॉ.धनंजय काळेंच्या अवयवदानामुळे ६ जणांना 'नवजीवन'
- कृष्णा काळे
पूर्णा ( परभणी) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जालन्यात माणुसकीचा एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग अनुभवायला मिळाला. पुणे येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे तरुण डॉक्टर धनंजय अनंत काळे (रा. एरंडेश्वर, ता. पूर्णा) यांचा अपघातात मेंदूमृत (Brain Dead) झाला. मात्र, या प्रचंड दुःखाच्या प्रसंगातही काळे कुटुंबाने मोठे मन दाखवत धनंजयचे अवयव दान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे तब्बल सहा रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे.
अपघात अन् डॉक्टरकीची अखेरची सेवा
धनंजय काळे हे पुण्याहून परीक्षेसाठी जालना येथे आले होता. परत जात असताना छत्रपती संभाजीनगर चौफुलीजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. जालन्यातील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांकहा मेंदूमृत घोषित केला. डॉक्टर मुलाचे समाजसेवेचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला.
ग्रीन कॉरिडॉर अन् सहा जणांना जीवदान
जालना पोलिसांच्या मदतीने १ जानेवारी रोजी तातडीने 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला. धनंजय यांचे दोन मूत्रपिंड, दोन फुफ्फुसे, एक यकृत आणि डोळ्यांचे बुबुळ असे सहा अवयव तातडीने छत्रपती संभाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयांत पोहोचवण्यात आले. यामुळे सिग्मा हॉस्पिटल, हेडगेवार रुग्णालय आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील सहा गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. जालना जिल्ह्यातील हा पहिलाच मोठा अवयवदानाचा प्रसंग असल्याचे सांगितले जात आहे. धनंजय यांनी स्वतः डॉक्टर म्हणून समाजहितासाठी सेवा देण्याचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांनी मृत्यूनंतर देखीलही आपल्या देहाच्या रूपाने पूर्ण केले आहे.
यांचे प्रयत्न आले कामी
जालना जिल्ह्यातील हा पहिलाच अवयवदानाचा प्रसंग असल्याचे सांगण्यात येत असून या वेळी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व नागरिकांनी श्वास रोखून हा क्षण अनुभवला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी डॉ. बळीराम बागल, डॉ. रजनीकांत जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, धनंजयचे वडील अनंत काळे, रितेश काळे व डॉ. वझरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.