भाव गडगडल्याने खर्चही निघेना; शेतकऱ्याने फिरविला ५ एकर केळीच्या बागेवर जेसीबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:55 IST2025-11-21T18:54:04+5:302025-11-21T18:55:08+5:30
केळीचे भाव गडगडले, थेट २५० रुपये प्रतिक्विंटल दर, शेतकऱ्याने ५ एकर बागेवर फिरवला जेसीबी

भाव गडगडल्याने खर्चही निघेना; शेतकऱ्याने फिरविला ५ एकर केळीच्या बागेवर जेसीबी
पाथरी (जि. परभणी) : मोठ्या प्रमाणात खर्च करूनही बाजारपेठेत भाव मिळत नाही. केळी खरेदीसाठी व्यापारी येत नाही. त्यामुळे केलेला खर्चही निघत नसल्याने पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील सुरजदेवी रामनिवस पोरवाल यांनी तोडणीस आलेली पाच एकर केळीची बाग जेसीबीने जमीनदोस्त केली.
पारंपरिक शेतीला फाटा देत लोणी बु. येथील शेतकरी सुरजदेवी पोरवाल यांनी गट नंबर ८१ मध्ये पाच एकर केळीची लागवड केली. लागवडपूर्व मशागत, सिंचन, खते, औषधींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. पीकही चांगले आले. यातून दोन पैसे मिळतील अशी आशा पोरवाल यांना होती. मात्र, तोडणीला पीक येताच भाव गडगडले. व्यापारीही खरेदीसाठी येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले. साधारणपणे केळीला १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळायचा; आता तो २५० रुपयांवर येऊन ठेपला आहे. शिवाय व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवल्याने हवालदिल होऊन पोरवाल यांनी उभ्या केळीच्या बागेवर जेसीबीच फिरविला.
शासन याकडे केव्हा लक्ष देणार
असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. केळीला निश्चित असा हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, शासन याकडे केव्हा लक्ष देईल, असा प्रश्न पोरवाल यांनी केला आहे.