अतिमद्यपान केल्याने तरुणाचा मृत्यू; सेलूत रस्त्याच्या कडेला आढळला होता मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:33 IST2022-06-14T13:32:53+5:302022-06-14T13:33:15+5:30
तरुणास अतिमद्यपान करण्याचे व्यसन होते. यातूनच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अतिमद्यपान केल्याने तरुणाचा मृत्यू; सेलूत रस्त्याच्या कडेला आढळला होता मृतदेह
देवगावफाटा (परभणी) : सेलू शहरातील रायगड काँर्नर परिसरात रस्त्यावर आज सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटली असून रणजीत जगन्नाथ राठोड (३८) असे नाव आहे. त्याला अतिमद्यपान करण्याचे व्यसन होते. यातूनच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी ६. ३० वाजेच्या सुमारास काही नागरिक मॉर्निंग वॉक करण्यासाठी सेलूतील रायगड कॉर्नर परिसरात आले होते. यावेळी त्यांना रस्त्यावर पडलेला मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तत्काळ याची माहिती सेलू पोलिस ठाण्यात दिली. प्रभारी पोलिस निरीक्षक राहिरे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, रणजीत जगन्नाथ राठोड असे मृताचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिमद्यपान केल्याने झाला मृत्यू
मृताच भाऊ संजय जगन्नाथ राठोड ( रा.श्रीराम काँलनी, सेलू ) याने पोलिसात माहिती दिली की, रणजीत जगन्नाथ राठोड यास दारूचे व्यसन होते. अनेक उपचार करूनही त्याचे व्यसन सुटत नव्हते. सोमवारी रात्री त्याने दारूचे अतिसेवन केले होते. यातच राठोड याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा.