मानवतला सकल मराठा समाजाचे सामूहिक कपडे फाडो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:25 IST2020-09-23T13:24:12+5:302020-09-23T13:25:24+5:30
मराठा आरक्षणाची स्थगिती उठवा, नोकर भरतीला स्थगिती द्यावी, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.

मानवतला सकल मराठा समाजाचे सामूहिक कपडे फाडो आंदोलन
मानवत : मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी बुधवार दि. २३ सप्टेंबररोजी सकल मराठा समाजाने तहसिल कार्यालयासमोर सामूहिक "कपडे फाडो आंदोलन" करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. आंदोलानादरम्यान मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली.
तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने एका पाठोपाठ आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. दि. १९ सप्टेंबर रोजी मानवत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर दि. २१ रोजी नगरपालिकेसमोर सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले होते. यानंतर आता बुधवारी सकाळी सकल मराठा समाजातर्फे तहसिल कार्यालयासमोर कपडे फाडो आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाची स्थगिती उठवा, नोकर भरतीला स्थगिती द्यावी, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. प्राचार्य केशव शिंदे, प्रा. अनुरथ काळे, मुख्याध्यापक बालाजी गजमल, लक्ष्मण साखरे, उद्धव हारकाळ, प्रा.मोहन बारहाते, ॲड.सुनील जाधव यांच्यासह अनेकजणांची उपस्थिती होती. प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. पो. नि. उमेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार, उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.