परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती
By मारोती जुंबडे | Updated: October 6, 2025 08:41 IST2025-10-06T08:38:30+5:302025-10-06T08:41:30+5:30
परभणी शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक नागरी भागात पाणी नागरिकांच्या घरात गेले.

परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती
परभणी : सोमवारी पहाटे सुमारास जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. पहाटे ४ वाजल्यापासून अवकाळी व अतिवृष्टीच्या स्वरूपात मुसळधार पाऊस झाल्याने परभणी तालुक्यातील पेडगाव, आव्हाडवाडी, किनोळा, आर्वी, कुंभारी, कारला, कास्टगाव, पिंपळगाव, गोविंदपूर, वाडी व परिसरातील अनेक गावांमध्ये कमरेइतके पाणी वाहू लागले. परिणामी शेतकरी आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.
शहरातही या पावसाने धुमाकूळ घातला असून, परभणी शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठा जलमय झाल्या. काही ठिकाणी तर पाणी घरात घुसल्याने नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात सोयाबीन आणि कापसाचे उरलेसुरले पीकही या मुसळधार पावसात पूर्णपणे वाहून गेले आहे. अनेक शेतांमध्ये पिकांच्या ऐवजी आता पाण्याचे तळे दिसत असून, शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेला आहे.
या पावसामुळे जिल्ह्यात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचे प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनियमित पावसामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना अंतिम झटका बसला आहे. आता शेतकऱ्यांसमोर जगायचे की मरायचे असा प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपयांहून अधिक मदत देण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
परभणी शहरात हाहाकार
परभणी शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक नागरी भागात पाणी नागरिकांच्या घरात गेले. अक्षदा मंगल कार्यालय ते रेल्वे उड्डाणपूल मालधक्का मार्गावर एका घरातून आजीला रेस्क्यू द्वारे घराबाहेर सुखरूप काढण्यात आले.
ढगफुटीचा तडाखा
परभणी तालुक्यातील पेडगाव आर्वी, किन्होळा, आव्हाडवाडी, वाडी, कुंभारी तसेच पेडगाव महसूल मंडळात ढगफुटी.आर्वी येथे ग्रामपंचायत सह मंदिर पाण्यात.