जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:16 AM2021-04-06T04:16:49+5:302021-04-06T04:16:49+5:30

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांची ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बँकेतील शेतकरी भवन सभागृहात निवडणूक ...

The chairman of the district bank will be elected today | जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड होणार

जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज निवड होणार

Next

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांची ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बँकेतील शेतकरी भवन सभागृहात निवडणूक होणार असताना, बँकेत जाण्यास मात्र माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांना मनाई असल्याने वरपूडकर गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आ. सुरेश वरपूडकर यांच्या महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनलने २१ पैकी ११ जागा मिळविल्या आहेत, तर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनेलने ९ जागा मिळविल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी जो गट आपणास अध्यक्षपद देईल त्यांना आपले चार सदस्य साथ देतील, अशी घोषणा केल्याने वरपूडकर गट अस्वस्थ झाला होता. त्यामुळे निवडणुकीत बोर्डीकर गटाकडून चमत्कार केला जातो की काय, अशी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर परभणी सत्र न्यायालयाने माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांना जिल्हा बँकेत जाण्यास मनाई केल्याचा आदेश काही महिन्यांपूर्वी काढला होता. मंगळवारी जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने बोर्डीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बॅंकेत जाण्यास परवानगी देण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, न्या. मंगेश पाटील यांच्या न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यामुळे बोर्डीकर यांनी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती सरकारी वकील ॲड. डी. आर. काळे यांनी फोनवर ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे बोर्डीकरांना मतदान प्रक्रियेत भाग घेणे शक्य होणार नाही. परिणामी या गटाचे आणखी एक मत कमी होणार आहे. परिणामी वरपूडकर गटाच्या अध्यक्षपद मिळविण्याच्या आशा आणखीच वाढल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी नेमके काय होईल, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. पालममधून निवडून आलेले भाजपचे गणेश रोकडे आणि पुर्णेतील बालाजी देसाई यांच्या भूमिकेबरोबरच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या भूमिकेकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: The chairman of the district bank will be elected today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.