झीरो फाट्याजवळ कार आणि हायवा ट्रकची धडक; गाडीचा चक्काचूर, एकाचा जागीच अंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:56 IST2026-03-30T15:55:47+5:302026-03-30T15:56:37+5:30
परभणी-वसमत महामार्गावर भीषण अपघात; नांदेडचा एक जण जागीच ठार.

झीरो फाट्याजवळ कार आणि हायवा ट्रकची धडक; गाडीचा चक्काचूर, एकाचा जागीच अंत!
एरंडेश्वर (जि. परभणी): परभणी-वसमत महामार्गावरील पूर्णा तालुक्यातील झीरो फाट्याजवळ रविवारी दुपारी कार आणि हायवा ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कारमधील श्रीराम विठ्ठलराव भिसे (रा. शिवदत्तनगर, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जोरदार होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर हायवा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला.
घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
हायवा पलटी अन कारचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम भिसे हे रविवारी दुपारी आपल्या कारने (क्रमांक MH 26 CE 2369) वसमतकडून परभणीच्या दिशेने जात होते. याच वेळी परभणीकडून वसमतकडे येणाऱ्या हायवा ट्रकने (क्रमांक MH 26 H 5226) कारला जोराची धडक दिली. धडक बसताच हायवा ट्रक रस्त्यावर उलटला, तर कार पूर्णपणे दाबल्या गेल्याने भिसे यांचा जागीच अंत झाला.
पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी केली वाहतूक सुरळीत
अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पडलवाड, सुधीर काळे आणि पोलीस पाटील बापूराव राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासनतास अडकलेली वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.