मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:38 IST2026-01-12T13:36:12+5:302026-01-12T13:38:44+5:30
जामिनावर सुटल्यानंतर चारच दिवसांत संपवले आयुष्य; स्वतःच्या घरात घेतला गळफास

मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन
परभणी: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या भारतीय संविधान विटंबना प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता सोपान पवार याने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणी तालुक्यातील मिर्झापूर येथील स्वतःच्या शेतातील आखाड्यावर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
जामिनावर सुटताच संपवले जीवन
दत्तराव पवार याला संविधान अवमान प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. ८ जानेवारी रोजी त्याची जामिनावर सुटका झाली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो मिर्झापूर येथील शेत आखाड्यावर वास्तव्यास होता. मात्र, सोमवारी सकाळी ८:३० वाजता त्याने शेतातील घरात गळफास घेतल्याचे आढळून आले.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू आणि सुधीर डोंबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.