मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:46 IST2025-10-28T16:45:53+5:302025-10-28T16:46:56+5:30
संतप्त शेतकऱ्याचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकार

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
- मारोती जुंबडे
परभणी: जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पालम तालुक्यातील चाटोरी येथील शेतकरी संतोष रावण पैके या व्यक्तीने संपूर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी या मागणीसाठी संतप्त होऊन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या गाडीवरच दगडफेक केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी संजय चव्हाण स्वतः उपस्थित असताना अचानक संतोष पैके यांनी गाडीवर मोठा दगड फेकला, त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, अधिकारी व कर्मचारी काही काळ तणावग्रस्त झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतोष पैके यांना ताब्यात घेऊन नवा मोंढा पोलीस ठाण्यात रवाना केले.
पोलिसांकडून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, संतोष पैके यांनी हा प्रकार कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी आंदोलन म्हणून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी चर्चा रंगली असून, शेतकऱ्यांच्या वाढत्या असंतोषाचे हे प्रकटीकरण असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.