परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 13, 2022 14:15 IST2022-12-13T14:13:44+5:302022-12-13T14:15:34+5:30
वसमत रस्त्यावरील आयोजित कार्यक्रम आटपून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जिंतूर कडे रवाना होताना घडला प्रकार

परभणीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
परभणी : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ वाजता परभणी शहरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने मनोज गडबडे व इतरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे हे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी परभणी शहरातील आंबेडकरवादी संघटनांच्यावतीने आज दुपारी वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन सुरू होते.
यावेळी वसमत रस्त्यावरील आयोजित कार्यक्रम आटपून बावनकुळे हे जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात आयोजित आढावा बैठकीस जात होते. तेव्हा आंबेडकरवादी संघटनांच्यावतीने त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला. यादरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर हा ताफा पुढे गेला. दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड करीत नवा मोंढा पोलिस ठाण्यात आणले आहे.