पालम तालुक्याच्या गोदावरी पट्यात ऊसाचे क्षेत्र वाढले, पदरमोड करून बेणे घेण्यावर शेतक-यांचा भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:10 IST2017-11-24T14:03:13+5:302017-11-24T14:10:31+5:30
पालम तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीपात्रात यावर्षी पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने या पट्यात उसाची लागवड वाढली आहे.

पालम तालुक्याच्या गोदावरी पट्यात ऊसाचे क्षेत्र वाढले, पदरमोड करून बेणे घेण्यावर शेतक-यांचा भर
परभणी - पालम तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीपात्रात यावर्षी पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने या पट्यात उसाची लागवड वाढली आहे. सध्या अनेक शेतकरी ऊस लागवड करतांना दिसून येत असून यासाठी लागणारे बेणे कारखान्याकडून न घेता पदरमोड करून घेण्याकडे शेका-यांचा कल अधिक आहे.
पालम तालुक्यात मागील तीन वर्षात दुष्काळाची स्थिती होती़ सतत तीन वर्ष पावसाचे प्रमाण कमी असल्याने होते़ त्यामुळे खरीप हंगामासह रबी हंगामातील पिके हातची गेली होती़ यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतक-यांनी सोयाबिन, कापसाची लागवड झाली. परंतु, त्यानंतर दोन महिने पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. शिवाय ऐन सोयाबीन काढणीच्या काळात परतीचा पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली.
उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतक-यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून रबी हंगामाची पेरणी सुरू केली. आता तर कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. नगदी पिकेच हातची गेल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. यावर्षी परतीच्या पावसाने शेतक-यांचे नुकसान केले असले तरी रबी हंगामासाठी हा पाऊस चांगला झाला आहे. गोदावरी नदीपात्रातही पुरेसा पाणीसाठा आहे. डिग्रस बंधा-यातही मूबलक पाणीसाठा आहे. बंधा-याचे बॅकवॉटर पाणी सावंगी भू. पर्यंत आले आहे. त्यामुळे गोदावरी पट्यामध्ये ऊस लागवडीकडे शेतकरी वळले आहेत.
याशिवाय सावंगी भू., रावराजूर, धनेवाडी, खुर्लेवाडी, उमरथडी, आरखेड, घोडा, सोमेश्वर, फळा, फरकंडा, डिग्रस, गुळखंड, जवळा आदी गावातील शेतकरी उसाची लागवड करताना दिसत आहेत. तालुक्याच्या चारही बाजूने साखर कारखाने सुरू झाल्याने उसापासून उत्पादनातील कसर भरून निघेल, असा कयास शेतकरी लावत आहेत.
पदरमोड करून बियाणाची खरेदी
तालुक्यात यावर्षी उसाचे क्षेत्र प्रथमच वाढले असल्याने ऊस लागवडीसाठी कारखान्याकडून बेणे घेण्याऐवजी पदरमोड करून बेण्याची खरेदी केली जात आहे. कोणत्याही कारखान्याची ऊस नेण्यासाठी सक्ती नको, यासाठी शेतकरी हे पाऊल उचलत आहेत. यासोबतच सातबारा, ओखळपत्र, बँक पासबूक आदी कागदपत्र देतानाही शेतकरी आखडता हात घेत असतानाचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, ऊस लावताना कमी कालावधीत चांगले उत्पादन देणा-या १०.००१ या जातीला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. तीन ते साडेतीन हजार प्रती क्विंटल टन हे बियाणे विकत घेत आहेत.