निवडणूक कामासाठी नियुक्ती अन् सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी; शिक्षकांची झाली गोची

By मारोती जुंबडे | Updated: February 2, 2026 12:20 IST2026-02-02T12:19:56+5:302026-02-02T12:20:25+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक असल्याने अनेक शिक्षकांनी निवडणूक कामातून मुक्तता देण्याची मागणी केली

Appointment for polling work and CTET exam on the same day; Teachers were disappointed | निवडणूक कामासाठी नियुक्ती अन् सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी; शिक्षकांची झाली गोची

निवडणूक कामासाठी नियुक्ती अन् सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी; शिक्षकांची झाली गोची

परभणी : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारी रोजी घेण्याची घोषणा केली आहे. मात्र याच दिवशी शिक्षकांसाठीची सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा असल्याने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ५ हजार २४० कर्मचाऱ्यांपैकी ३ हजार ३४१ शिक्षकांची मोठी गोची झाली आहे. परिणामी या शिक्षकांच्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

परभणी जिल्ह्यातील ५४ जिल्हा परिषद सर्कल व १०८ पंचायत समिती गण यासाठी सुरुवातीला ५ फेब्रुवारी रोजी मतदान नियोजित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमात बदल करत ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी असे नवे वेळापत्रक जाहीर केले. दरम्यान, मतदानाचा दिवस आणि सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक असल्याने अनेक शिक्षकांनी निवडणूक कामातून मुक्तता देण्याची मागणी करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या शिक्षकांच्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती अन् प्रशिक्षण
या पार्श्वभूमीवर, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून ज्या शिक्षकांची सीटीईटी परीक्षा आहे, त्यांच्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त करून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पर्यायी मनुष्यबळ उभे करणे आणि प्रशिक्षण पूर्ण करणे हे प्रशासनासाठी आव्हान ठरणार असून, शिक्षकांची झालेली ही गोची सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

तालुकानिहाय शिक्षक नियुक्ती
परभणी १६७, मानवत ३८९, सेलू ६६६, पाथरी २३६, सोनपेठ ३८६, पूर्णा ८१८, गंगाखेड १७९ अशी एकूण ३,३४१ शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

५४ गट अन् १०८ गणांसाठी निवडणूक
परभणी जिल्ह्यात ५४ जिल्हा परिषद गट व १०८ पंचायत समिती गण यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीत गटांसाठी २४७ उमेदवार, तर गणांसाठी ४३३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करत १,२७८ मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. मात्र या मनुष्यबळामध्ये जवळपास साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती असल्याने आता मतदानाच्या दिवशीच शिक्षकांची सीटीईटी परीक्षा आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

निवडणुकीच्या कामातून सूट मिळावी
‘शिक्षक पात्रता परीक्षा आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान एकाच दिवशी आल्याने अडचण झाली आहे. एकीकडे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे आणि दुसरीकडे शिक्षक पात्रता परीक्षा देणे यामुळे शिक्षकांची गोची झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना सूट मिळावी, अशी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी आहे.
सतीश कांबळे, राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना

Web Title : चुनाव ड्यूटी और सीटीईटी परीक्षा एक ही दिन, शिक्षक मुश्किल में।

Web Summary : परभणी में चुनाव ड्यूटी और सीटीईटी परीक्षा एक साथ होने से शिक्षक दुविधा में हैं। कई छूट चाहते हैं, जिससे प्रशासन पर 7 फरवरी के मतदान से पहले प्रतिस्थापन खोजने और प्रशिक्षण प्रदान करने का दबाव है।

Web Title : Election duty and CTET exam clash puts teachers in a fix.

Web Summary : Parbhani teachers face dilemma as election duty and CTET exam coincide. Many seek exemption, straining administration to find replacements and provide training before the February 7th poll.