खाकीतील देवदूतांची किमया! पोलिसांमुळे १२ वर्षांनंतर मुंबईत हरवलेली आई सेलूच्या घरी परतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 20:00 IST2026-01-20T19:55:40+5:302026-01-20T20:00:19+5:30
मुंबईत भिक्षा मागताना सापडली माऊली; हवालदार शिवदास सूर्यवंशींनी अवघ्या १२ तासांत शोधलं हरवलेल्या माऊलीचं घर

खाकीतील देवदूतांची किमया! पोलिसांमुळे १२ वर्षांनंतर मुंबईत हरवलेली आई सेलूच्या घरी परतली
परभणी/सेलू: नियतीचे खेळ अनाकलनीय असतात, याची प्रचिती देणारी एक सुखद घटना परभणी जिल्ह्यात समोर आली आहे. मुंबईत भिक्षा मागताना सापडलेल्या एका वृद्ध महिलेचा शोध घेत असताना, त्या बारा वर्षांपूर्वी हरवल्या असल्याचे समोर आले. सेलू पोलीस ठाण्यातील हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या विलक्षण कार्यतत्परतेमुळे या महिलेची तब्बल १२ वर्षांनंतर आपल्या मुलाशी गाठ पडली आहे.
नेमकी घटना काय?
मुंबई परिमंडळ एकच्या पथकाने १३ जानेवारी रोजी भिक्षेकऱ्यांविरुद्ध मोहीम राबवली होती. यावेळी सीएसटी परिसरात गोदावरी राऊत ही महिला भिक्षा मागताना आढळली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चेंबूर येथील शेल्टर होममध्ये पाठवले. 'कोशिश' या संस्थेच्या मदतीने त्यांची चौकशी केली असता, त्यांचे नातेवाईक परभणी जिल्ह्यातील सेलू येथे असल्याची पुसटशी माहिती मिळाली.
हवालदार सूर्यवंशींचे 'मिशन १२ तास'
मुंबई पोलिसांनी तात्काळ सेलू पोलीस ठाण्यातील हवालदार शिवदास सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. सूर्यवंशी यांनी हाताशी असलेल्या अत्यंत तुटपुंज्या माहितीचा आधार घेतला आणि सेलू शहरात शोधाशोध सुरू केली. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे, सूर्यवंशी यांनी अवघ्या १२ तासांच्या आत महिलेच्या मुलाचा, किशोर राऊत यांचा शोध लावला.
१२ वर्षांची प्रतीक्षा संपली
जेव्हा किशोर राऊत यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांची आई १२ वर्षांपूर्वी मुंबईतून हरवली होती. अनेक प्रयत्न करूनही ती सापडली नव्हती. किशोर यांनी आपल्या आईची ओळख पटवली आणि राऊत कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. एका मुलासाठी आपली आई पुन्हा मिळणे, हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद ठरला.
पोलीस दलातून कौतुकाचा वर्षाव
हवालदार शिवदास सूर्यवंशी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुंबईचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले आहे. पोलीस अधीक्षक परदेशी यांनीही सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले असून, सध्या संपूर्ण जिल्ह्यात या 'खाकी'तील माणुसकीची चर्चा सुरू आहे.