खळबळजनक! तिहेरी खून खटल्यातील न्यायाधीन बंदीने परभणी जिल्हा कारागृहात जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:24 IST2026-01-02T12:23:51+5:302026-01-02T12:24:34+5:30
परभणी तालुक्यातील आसोला येथे आपल्या आईसह मावशी व काकाचा खून केल्याच्या आरोपाखाली न्यायाधीन बंदी होता.

खळबळजनक! तिहेरी खून खटल्यातील न्यायाधीन बंदीने परभणी जिल्हा कारागृहात जीवन संपवले
- मारोती जुंबडे
परभणी : येथील जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून असलेल्या राजू गोविंद अडकिने (३५, रा. दारेफळ, ता. वसमत) याने शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे जिल्हा कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
परभणी तालुक्यातील आसोला येथे आपल्या आईसह मावशी व काकाचा खून केल्याच्या आरोपाखाली राजू अडकिने याच्याविरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल होता. २१ मार्च २०२२ पासून तो जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून दाखल होता. त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञांकडून उपचारही सुरू होते. शुक्रवारी पहाटे बॅरेक क्रमांक एक येथील बाथरूमच्या खिडकीला पांघरुणासाठी देण्यात आलेल्या शॉलच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले.
घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यायदंडाधिकारी वर्मा यांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा पंचनामा करण्यात आला. यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, कारागृह अधीक्षक मरळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.