रुग्णालयातील पत्नीची भेट शेवटची ठरली; तिच्यासाठी जेवण आणताना पतीचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:51 IST2024-12-20T11:47:24+5:302024-12-20T11:51:45+5:30
ट्रॉलीवर दुचाकी धडकून अपघात; पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील तरुणाचा मृत्यू

रुग्णालयातील पत्नीची भेट शेवटची ठरली; तिच्यासाठी जेवण आणताना पतीचा अपघाती मृत्यू
- विठ्ठल भिसे
पाथरी: सेलू-पाथरी रस्त्यावर सेलू पासून ५ किमी अंतरावर रस्त्यात उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. अंकुश प्रकाश मगर ( 34, रा देवेगाव, ता. पाथरी ) असे मृताचे नाव आहे. ते कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी सेलू येथे शासकीय रुग्णालयात दाखल पत्नीला भेटून दुसऱ्या दिवशीचा जेवणाचा डब्बा आणण्यासाठी गावाकडे परतत होते. त्यांची हीच पत्नीसोबतची भेट अखेरची ठरली.
पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील अंकुश मगर यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी पत्नीस सेलू येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी दाखल केले. शुक्रवारी सकाळीच शस्त्रक्रिया होणार असल्याने पती अंकुश रुग्णालयातील पत्नीस भेटून शुक्रवारी सकाळी जेवणाचा डब्बा घेऊन येण्यासाठी रात्री ७. ४५ वाजता गावाकडे परत निघाले. सेलू ते पाथरी रस्त्यावर सेलू पासून ५ किमी अंतरावर त्यांची दुचाकी रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाठीमागून धडकली. यात अंकुश मगर गंभीर जखमी झाले.
दरम्यान, याच मार्गे सेलूकडे जाणाऱ्या देवेगाव येथील सरपंच पप्पू गलबे यांना अपघात निदर्शनास आला. अपघाताची माहिती गावकऱ्यांना देऊन गलबे यांनी मगर यांना तातडीने सेलू येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून अंकुश यांना मृत घोषित केले.
पत्नीची भेट शेवटची ठरली
अंकुश मगर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. अपघातापूर्वी पत्नीस भेटून गावाकडे निघालेल्या अंकुश यांना अपघातात गंभीर जखमी अवस्थेत त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांची गावाकडे जातानाची पत्नीची भेट शेवटची ठरली.