हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांविरोधात ‘दरिंदा’ शब्दप्रयोग; भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:52 IST2025-11-22T19:49:03+5:302025-11-22T19:52:33+5:30
पाथरीत सपकाळ यांच्या विधानाने राजकीय तापमान वाढले, जिंतूर नाका येथे भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवून वक्तव्याचा निषेध

हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांविरोधात ‘दरिंदा’ शब्दप्रयोग; भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध
- विठ्ठल भिसे/मोहन बोराडे
पाथरी/सेलू : महाराष्ट्रात जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका कोण? तर देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा कोण असेल तर तोही फडणवीसच. त्यांची नार्को टेस्ट करा. मराठा आणि ओबीसीमध्येही त्यांनीच भांडणे लावली. समृद्धी महामार्गामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला. देशात सर्वाधिक भ्रष्टाचारही याच राज्यात होतो, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी पाथरीतील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सेलू येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिंतूर नाका येथे त्यांना काळे झेंडे दाखवून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला.
सपकाळ यांनी पाथरी येथे घेतलेल्या प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. या विधानाने राजकीय तापमान वाढणार आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्या समर्थनार्थ जिल्हा परिषद मैदानावर २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सभा झाली. सपकाळ म्हणाले, महाराष्ट्रातील जाती-जातींना लढवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. वारेमाप पैसा घेऊन निवडणुकीला उतरले आहेत. आपला स्वाभिमान घ्यायला आलेत. यांना धडा दाखवा. झुकेगा नही साला.. असा बाणा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन मतदारांना केले. जातीयवाद्यांसोबत जायचे की संविधानवाल्यांसोबत जायचे हे ठरवा. काँग्रेसच सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने साथ देण्याचे आवाहनही सपकाळ यांनी केले.
यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार सुरेश देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, नागसेन भेरजे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, नासेर शेख, मुजाहेद खान, सुभाष कोल्हे, तबरेज दुर्राणी, आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ यांना सेलूत दाखवले काळे झेंडे
सेलू येथे काँग्रेस आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ हर्षवर्धन सपकाळ सभा घेण्यासाठी शनिवारी सेलू येथे दाखल झाले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात त्यांनी पाथरीत वादग्रस्त विधान केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेलू येथे सपकाळ आले असता त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गणेश काटकर, श्याम चाफेकर, भागवत दळवे, शिवहरी शेवाळे, डॉ. गणेश थोरे, काका आवटे, लक्ष्मण बोराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.