श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:17 IST2025-08-11T11:15:19+5:302025-08-11T11:17:37+5:30
श्रावणात शोककळा, परतीच्या मार्गावर असलेल्या भाविकांवर काळाचा घाला

श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी) : पाथरी-सेलू मार्गावर खेडूळा पाटीजवळ आज, सोमवारी ( दि. ११ ) पहाटे भरधाव कार कावड यात्रेत घसून झालेल्या भीषण अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू) अशी मृत भाविकांची नावे आहेत. श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
श्रावण सोमवार निमित्त सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे आलेल्या कावड यात्रेतील सुमारे २५० भाविक परतीच्या मार्गावर असताना पहाटे अंदाजे ५ वाजता कारने थेट यात्रेत घुसून हा अपघात घडला. या दुर्घटनेत ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू) हे जागीच ठार झाले. तर दोन गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके , जैस्वाल, थोरे आणि इतर कर्मचारी तातडीने 5.20 वाजता घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरू आहे.
श्रावण महिन्याचे औचित्य साधून संकल्प अखंड हिंदू राष्ट्र समितीच्यावतीने आज सकाळी सेलू येथील रेल्वे गेटपासून कावड यात्रेला सुरुवात होणार होती. यासाठी सेलू शहरात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. विविध भागात फलक, बॅनर लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. सेलू शहरासह तालुक्यातील शेकडो तरुण यात सहभागी झाले होते. रेल्वे गेटवरून सुरू झालेली ही यात्रा शंकर लिंग मंदिर, सुरज मोड येथे मिरवणुकीनंतर समाप्त होणार होती. मात्र, कावड यात्रा सेलू येथे पोहचण्यापूर्वी पाथरीतील अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सेलू शहरात शोककळा पसरली आहे.