स्टेशनजवळच होते, सचखंड एक्स्प्रेसमधून तोल जाऊन खाली पडल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:00 IST2024-07-05T16:59:40+5:302024-07-05T17:00:33+5:30
स्टेशनपासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने दुर्घटना

स्टेशनजवळच होते, सचखंड एक्स्प्रेसमधून तोल जाऊन खाली पडल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील मानवतरोड रेल्वेस्थानक परिसरात सचखंड एक्स्प्रेसमधून पडून रामकिशन माळी (वय १५) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ११:१५ वाजता घडली आहे.
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील रामकिशन माळी हा आपल्या कुटुंबासह सचखंड एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता सचखंड एक्स्प्रेस मानवतरोड शिवारात आली असता स्टेशनपासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याची माहिती मिळाली. या एक्स्प्रेसला मानवतरोड येथे थांबा नसल्याने रेल्वेची गती जलद असल्याने खाली पडून गंभीर दुखापत झाल्याने या मुलाचा मृत्यू झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह सहा तास पडून
रेल्वेतून पडून रामकिशन याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११.१५ वाजता घडली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणे आवश्यक होते. मात्र, सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत तब्बल सहा तास मृतदेह घटनास्थळी पडून होता.