'मुलाला पायलट बनवतो', म्हणत १३ लाख हडपले; नागपूर-अकोल्याच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:17 IST2026-01-12T13:11:30+5:302026-01-12T13:17:37+5:30
फिर्याद मागे घेण्यासाठी नागपूर-अकोल्याच्या भामट्यांकडून जीवे मारण्याची धमकी.

'मुलाला पायलट बनवतो', म्हणत १३ लाख हडपले; नागपूर-अकोल्याच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी): आपल्या मुलाने आकाशात झेप घ्यावी, त्याने 'पायलट' बनावे असे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका कुटुंबाला भामट्यांनी १३ लाख ३० हजार रुपयांना चुना लावल्याची धक्कादायक घटना सेलूमध्ये उघडकीस आली आहे. समाजकल्याण विभागाची शिष्यवृत्ती मिळवून देण्याच्या बहाण्याने नागपूर आणि अकोल्याच्या दोन आरोपींनी ही फसवणूक केली असून, याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कु. संध्या गायकवाड यांचा भाऊ सागर याला पायलट बनवण्यासाठी आरोपी प्रितेश इंगळे (अकोला) आणि श्रीकांत पानतावने (नागपूर) यांनी २०१८ मध्ये जाळ्यात ओढले. "सामाजिक न्याय विभागाकडून शिष्यवृत्ती मिळवून देतो" असे सांगून सुरुवातीला ५ लाख रुपये उकळले. पुढे "प्रशिक्षणास नंबर लागला आहे, आता नागपूर येथे राहण्यासाठी वडिलांच्या नावे घर खरेदी करू" असे भासवून पुन्हा ८ लाख ३० हजार रुपये लाटले.
फिर्याद मागे घेण्यासाठी धमकावण्याचा प्रयत्न
रक्कम घेऊन आरोपी फरार झाल्यानंतर पीडित पित्याने सेलू न्यायालयात धाव घेतली. मात्र, फिर्याद मागे घेण्यासाठी आरोपींनी मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना झाले आहे. पोलीस हवालदार शेख उस्मान या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.