हे असे कसे बेभरवशाचे ‘वेड?’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 08:25 PM2021-11-18T20:25:50+5:302021-11-18T20:26:22+5:30

जेव्हा जेव्हा वाटेल ना आपलं आयुष्य फार छळकुटं आहे, तेव्हा तेव्हा ही ‘वेड’ची गोष्ट नक्की आठवावी? सगळं संपलंय असं वाटत असतानाच नियती आणि माणसाचं कर्तृत्वही अशी काही कमाल करतं की, सारा माहौलच बदलून जातो. पार ‘वेड’ लागतं वेड.तर ही त्या वेडचीच गोष्ट.

t20 world cup 2021 matthew wade | हे असे कसे बेभरवशाचे ‘वेड?’

हे असे कसे बेभरवशाचे ‘वेड?’

googlenewsNext

- अभिजित पानसे

जेव्हा जेव्हा वाटेल ना आपलं आयुष्य फार छळकुटं आहे, तेव्हा तेव्हा ही ‘वेड’ची गोष्ट नक्की आठवावी? सगळं संपलंय असं वाटत असतानाच नियती आणि माणसाचं कर्तृत्वही अशी काही कमाल करतं की, सारा माहौलच बदलून जातो. पार ‘वेड’ लागतं वेड.तर ही त्या वेडचीच गोष्ट.

ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू वेड. आठवतोय ना, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वेड लागल्यासारखा खेळणारा..तसंही आजवरचा त्याचा खेळ आणि त्याचं जगणंही क्रिकेटचं एक विशेषच घेऊन येतं, अनप्रेडिक्टेबल.जेव्हा जेव्हा वाटेल ना की, आपल्यासमोर फार संकटं आहेत, आपलं लाइफच बेक्कार आहे, आपल्याला फार छळतं जगणं तेव्हा तेव्हा या वेडची गोष्ट नक्की आठवावी अशीच आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला टेस्टीक्युलर कॅन्सर झाला. जगण्या मरण्याचा प्रश्न. ऐन तारुण्यात पुरुषांना होणाऱ्या या कॅन्सरने वेडचं क्रिकेट करिअरचं स्वप्नही संपवलंच होतं. पण, योग्यवेळी उपचार मिळाले, किमोथेरपी घेऊन तो ठणठणीत बरा झाला. त्यानं आपल्या फिटनेसवर जिद्दीनं काम केलं. दरम्यान तो प्लम्बिंगचं काम शिकला. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत स्वतःला व्यग्र ठेवू लागला. त्याचकाळात उपचारादरम्यान त्याचे केस गळाले होते. समवयस्क मुलांमध्ये मिसळणं अवघड वाटायचं म्हणून तो एकेकटाच रहायचा. मात्र या साऱ्यातूनही तो बाहेर पडला..आणि पुन्हा त्यानं क्रिकेटचा हात धरला, हॅन्डग्लोव्हज घालून पुन्हा मैदानात परत आला. त्याकाळी तो विकेटकिपिंगवर लक्ष केंद्रित करत होता. पण, त्याच्या लक्षात आलं की, टीम पेन हा उत्तम कीपर आहे, आपण स्पर्धेत त्याच्यापेक्षा कमी आहोत.

डोमेस्टिक क्रिकेट खेळतानाच मग तो स्वतःच्या बॅटिंगवर जास्त लक्ष देऊ लागला. त्याच्याकडे मोठे शॉट मारण्याची कला आणि ताकद होती. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या. २०११ वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध क्वार्टर फायनल हरल्यावर ऑस्ट्रेलिया संघात मोठे बदल झाले. जुनी मोठी नावे निवृत्त झाली. ऑस्ट्रेलियाला ॲडम गिलख्रिस्ट नंतर कोण याचं उत्तर मॅथ्यू वेडमध्ये मिळालं. २०१२ मधील भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या गाजलेल्या सिरीजमध्ये मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर संधी मिळाली पण, ती प्रमुख विकेट किपर हॅडिनच्या बॅकअप रुपात. नियतीने पुन्हा अनुकूल फासे टाकत त्याला इथे पुन्हा संधी दिली. हॅडिनने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली, वेडने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शेवटच्या टेस्टमध्ये सेंच्युरी मारत मिळालेल्या संधीचं सोनं केलं. बॅटिंग तर, तो दणक्यात करतोच मग, त्याला आपसूकच आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून कॉण्ट्रॅक्ट मिळालं. पण, त्याचा खेळ याच काळात वरखाली करतच होता. संघात आतबाहेर सुरुच होतं. त्यात त्याच्यासमोर अजून एक संकट आव्हान म्हणून उभं होतंच.

मॅथ्यू वेड कलर ब्लाइंड आहे. त्याला डे अँड नाईट मॅचमध्ये बॉल बघताना विशेषतः गुलाबी बॉल बघताना अडचण होते. मात्र तरीही त्यानं जिद्द सोडली नाही, डे-नाइट फॉरमॅटमध्येही त्यानं दणकून रन्स केले. मात्र २०१८ नंतर वेड त्याच्या अनियमित परफॉर्मन्समुळे संघाबाहेर गेला. फारच त्याच्या बेभरवशाच्या खेळावर टीका झाली. पण, त्या काळातही तो शांत होता. संघाबाहेर बसला त्याच काळात तो क्रिकेट सोडून सुतारकाम शिकला. सिमेंट, लाकूड, स्क्रू फिट करणे यात रमला. सर्वसामान्य माणूस रोज कसं काम करतो, कशी मेहनत करतो, हे तो त्यातून शिकला. याकाळात त्याला त्याच्या बायकोची साथ मिळाली. किंवा तिच्यामुळेच तो ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करू शकला असं म्हणता येईल.

ती प्रेग्नंट असताना मॅथ्यूला ऑस्ट्रेलिया ए टीममधून खेळण्यासाठी कॉल आले असताना त्याने त्याच्या बायकोला फोन रिसिव्ह करून तो खेळण्यास उपलब्ध नाही असं सांगण्यास सांगितलं. पण, त्याच्या बायकोने वेगळंच केलं. तिने तिच्या डॉक्टरला फोन करून बाळाची डिलिव्हरी वेळेआधीच करायला सांगितली. जेणेकरून मॅथ्यूला खेळायला जाता येईल. ठरल्या वेळेआधीच डिलिव्हरी झाली. त्यांना मुलगी झाली, तिचं नाव त्यांनी गोल्डी ठेवलं. आणि मॅथ्यू वेड ॲशेस खेळायला गेला.

इतकं बेभरवशाचं आयुष्य जगणारा किंवा जगणं सतत त्याला परीक्षेला बसवत असतानाही तो खेळतो. बिनधास्त. मस्त असतो. जमलं तर, जमलं, नाहीतर रमतो स्वत:च्याच विश्वात..आताही नाही का सेमीचं रिंगण ओलांडून देत त्यानं संघाला फायनलपर्यंत पोहोचवलं..
आणि तो पुन्हा आपलं नाकासमोरचं बेभरवशाचं जगणं एन्जॉय करायला मोकळा..

Web Title: t20 world cup 2021 matthew wade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.