वडिल बँड वाजवयाचे तर भाऊ ढोल, राष्ट्रीय पुरस्कारविजेता 'खिसा'च्या लेखकाची संघर्षकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:29 PM2021-03-30T17:29:42+5:302021-03-30T17:32:08+5:30

राज यांनी माझ्याशी फेसबुकवर संपर्क केला होता. मग आम्ही भेटलो. आमच्या एका भेटीत त्यांना माझी ही गोष्ट ऐकवली. ती गोष्ट त्यांना खूप अपील झाली. मग मी तीन दिवसात स्क्रिनप्ले लिहिला

The story of the struggle to play the father's band, Bhau Dhol, the author of the national award winning 'Khisa' | वडिल बँड वाजवयाचे तर भाऊ ढोल, राष्ट्रीय पुरस्कारविजेता 'खिसा'च्या लेखकाची संघर्षकथा

वडिल बँड वाजवयाचे तर भाऊ ढोल, राष्ट्रीय पुरस्कारविजेता 'खिसा'च्या लेखकाची संघर्षकथा

Next
ठळक मुद्देमाझी पत्नी मीनाक्षी राठोड माझ्यासोबत होती. ती इतकी सुंदर, गोरीघारी. आम्ही दोघं दोन जगातले होतो. मात्र लोक मला तिच्यासोबत बघायचे तेव्हा त्यांना वाटायचं, अरे, ही मुलगी याच्यासोबत राहते म्हणजे याच्यात काहीतरी असलं पाहिजे

राष्ट्रीय पुरस्कार अर्थातच ‘खिसा’च्या टीमचा आहे. पण मुख्यतः तो माझा चित्रकार-दिग्दर्शक मित्र राज मोरेचा आहे. राज हा चौकटीत मावणारा माणूस नाही. तो खूप शांत, स्वतःत राहणारा असा आहे. तो ब्रशने नाही तर बांधकामाच्या थापीनं चित्र काढतो. सोबत चाकू, चमचा वापरतो. हे पाहता आपण समजू शकतो, की त्याच्या जगण्याचा दृष्टीकोन किती ब्रॉड आणि बोल्ड असेल. राज चित्रकार म्हणून पूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहाेचलेला आहे. याआधी त्यांच्या एका पेंटिंगला संगीत नाटक अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे. राज यांनी मला चित्रभाषा शिकवली. सौंदर्य कसं टिपावं याची तोंडओळख त्यांच्यासोबत राहून झाली.

राज यांनी माझ्याशी फेसबुकवर संपर्क केला होता. मग आम्ही भेटलो. आमच्या एका भेटीत त्यांना माझी ही गोष्ट ऐकवली. ती गोष्ट त्यांना खूप अपील झाली. मग मी तीन दिवसात स्क्रिनप्ले लिहिला. त्याच्या तिसाव्या दिवशीच आम्ही शूटिंग सुरू केलं. हे असं एरवी होत नसतं. अकोल्याजवळ त्यांच गाव आहे तिथं आम्ही शूटिंग केलं.

मला नेहमी वाटतं, की तुमच्याकडे असलेल्या गोष्टी, कथा, किस्से तुम्हाला मोठं करतात. ‘खिसा’ मी लिहितो आणि अभिनयातून मांडतो. माझा चित्रकार मित्र राज मोरे ते दिग्दर्शित करतो. तो ‘खिसा’ आम्हाला मोठं करतो. माझ्याकडे मातीतलं गाणं असेल तर ते मला मोठं करतं. ‘सेम सेम बट डिफरंट’ हा शोच माझ्या आयुष्यावरचा आहे. मी आजवर जे माझं जगणं सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं होतं ते मला मोठं करतं आहे.

हे जगणं मी आजवर लपवून ठेवलं होतं कारण मला वाटायचं, की हे मेनस्ट्रीमचं जगणं नाही आणि मला मेनस्ट्रीममध्ये जायचंय. नंतर कळालं, की अरे, मेनस्ट्रीम नावाचा काही प्रकारच नसतो. माझं जे जगणं आहे तेच तर मेनस्ट्रीम आहे... या जगण्याचं नाटक आणि सिनेमा होतो. हा सगळा खडतर प्रवास माझ्या आयुष्यात नसता तर मला नाही वाटत मी इथं असतो. मी कुठतरी ९ ते ५ नोकरी करत असतो. अर्थात नोकरी करणं वाईट नाही, पण पॅशन बाजूला ठेवत नाईलाजानं नोकरी करणं वाईट आहे.

या त्रासाशी डिल करत आलो म्हणूनच इथवर येऊ शकलो. विविध प्रकारचे कॉम्प्लेक्स अर्थात न्यूनगंड तुमच्यात असतातच. ते आहेत याचाही अनेकदा न्यूनगंड येतो. पण त्यांच काय करायचं हे कळलं पाहिजे. मी गावाकडून ग्लॅमरस जगात येताना, आल्यावर माझं उत्तर शोधलं ते म्हणजे शिक्षण आणि वाचन. या दोन गोष्टींमुळं लोक तुमचं ऐकतात. आणि लोक ऐकतात तेव्हा तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. हे म्हणणं चांगल्या पद्धतीनं तुम्ही मांडू शकता तेव्हा तुम्ही तिथले हिरो असता. हिच तर गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स देते !

माझा अर्धा कॉम्प्लेक्स इथं संपला, माझी पत्नी मीनाक्षी राठोड माझ्यासोबत होती. ती इतकी सुंदर, गोरीघारी. आम्ही दोघं दोन जगातले होतो. मात्र लोक मला तिच्यासोबत बघायचे तेव्हा त्यांना वाटायचं, अरे, ही मुलगी याच्यासोबत राहते म्हणजे याच्यात काहीतरी असलं पाहिजे, हा काही असातसा नसणार. तिच्याकडे माझ्याहून वेगळी सौंदर्यदृष्टी आहे. मी तिचं बाह्य सौंदर्य पाहिलं तिनं मात्र माझ्या आतलं काहीतरी पाहून मला निवडलं. म्हणून मला ती ग्रेट वाटते. आम्ही गेली १५ वर्ष एकमेकांना ओळखतो.

तर, मीनाक्षीनं मला अगदी चमचा कसा धरावा जेवताना इथपासूनचे मॅनर्स मुंबईत आल्यावर शिकवले. खूप लहानसहान गोष्टी अजूनही ती सतत सांगते. मी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी केल्या पण. आपण कृत्रिम वागण्या-बोलण्यापेक्षा जसे आहोत तसेच व्यक्त होऊ या हेसुद्धा एका टप्प्यावर वाटलेलं. पण नंतर हेसुद्धा जाणवलं, की एक अभिनेता म्हणून हे मारक ठरतं. मी माझ्या भाषेच्या प्रेमात नसावं किंवा प्रमाण-शुद्ध भाषेच्याही प्रेमात नसावं. मला इंग्रजीचाही कॉम्प्लेक्स होता. म्हणून मी मुद्दाम ‘लॉरेटा’ या इंग्लिश नाटकात भूमिका केली. तिथल्या शोमध्ये अगदी चहा द्यायला येणारही इंग्रजीतच बोलायचा. मी ठरवलं होतं, ज्याचा कशाचा कॉम्प्लेक्स आहे ते जाणीवपूर्वक करत राहायचं. आता याच ग्रुपसोबत मी ‘सोल’ आणि ‘सेम सेम बट डिफरंट’ करतो आहे.

गावी शिक्षणाला प्रचंड मान होता, आजही आहे. कारण कुणी दहावी-बारावीपुढं जात नाही. मी कथा-कविता लिहिल्या. पण सोबतच साहित्यात आणि नाट्यशास्त्रात एम. ए केलं. लोकांना मग कळलं, हा नुसतंच लिहित नाही, शिकलेला ही आहे. कलेला शिक्षणाची जोड मिळाली पाहिजे. कलाकार खूप आहेत. पण कलेला शिक्षणाची अर्थात ‘क्राफ्ट’ची जोड मिळते तेव्हा ती गोष्ट ‘दोन्ही जगांना’ मान्य होते. ते मी केलं. हे सगळं मला सापडत गेलं. अजूनही ते सापडणं सुरू आहे.

आता ‘सेम सेम बट डिफरंट’ नावाचा प्रयोग करतोय. त्यात मी खूप सापडलो, स्वतःला. अनेकदा या शोधात मी खूप रडलो. कारण काही गोष्टी अशा होत्या, ज्या प्रचंड खासगी होत्या. त्या कधीच नव्हत्या शेअर केल्या कुणाशी. त्या तिथे शेअर केल्या, कारण त्याशिवाय हा शो बनूच शकत नव्हता. म्हणजे, मी कधीच कुणाला सांगितलं नव्हतं, की माझे वडील बँड वाजवायचे. शिवाय घरात सगळे इन्स्ट्रूमेंटस् लटकलेले असायचे. भाऊ ट्रम्पेट वाजवायचा, अजून कुणी ढोल... असं.
मलाही इन्स्ट्रूमेंट वाजवायची इच्छा होती. वडिलांनी मला एक डफडं बनवून दिलं. ते गळ्यात अडकवून मी गल्लीत गेलो. मला वाटलं, मी ते वाजवेन आणि सगळे माझं कौतुक करतील. पण सगळी पोरं माझ्यावर हसायला लागली, माझ्या जातीचं नाव घेऊन चिडवायला लागले. हे मला खूप लागलं, मी रडत रडत घरी आलो, ते डफडं काढून ठेवलं. त्यानंतर मी कधीच कुठलं इन्स्ट्रूमेंट शिकलो नाही. हा किस्सा मी शोमध्ये वेगळ्या पद्धतीनं सांगतो.
हे जगणं अस्सल आहे, म्हणून सगळे भौगोलिक आणि संस्कृतीचे, जात-वर्गाचे अडथळे ओलांडून रसिकांना भिडतं. एका कलावंताला अजून काय पाहिजे असतं ना?
- कैलास लीला वाघमारे


मुलाखत आणि शब्दांकन - शर्मिष्ठा भोसले

kw3810@gmail.com

Web Title: The story of the struggle to play the father's band, Bhau Dhol, the author of the national award winning 'Khisa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.