आयपीएल- ८ मध्ये युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू

By Admin | Updated: February 16, 2015 13:01 IST2015-02-16T13:00:11+5:302015-02-16T13:01:03+5:30

विश्वचषकातील भारतीय संघात अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा समावेश नसला तरी युवराज सिंगची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.

Yuvraj Singh is the most expensive player in IPL-8 | आयपीएल- ८ मध्ये युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू

आयपीएल- ८ मध्ये युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १५ - विश्वचषकातील भारतीय संघात अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा समावेश नसला तरी युवराज सिंगची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. आयपीएलच्या आठव्या पर्वातील लिलावात युवराज सिंग हा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल १६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. 
आयपीएलचे आठवे पर्व ८ एप्रिलपासून सुरु होत असून यासाठी सोमवारी बंगळुरुत लिलाव पार पडला. भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोघांमध्ये रस्सीखेच सुरु होती. गेल्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरुने युवराजला १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.  युवराजचे आधारमूल्य २ कोटी रुपये होते. सुरुवातीला राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब हे संघही इच्छूक होते. मात्र बोलीचा आकडा सात कोटींवर पोहोचताच त्यांनी माघार घेतले. यंदा युवराजसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल १६ कोटी रुपये मोजले.  युवराज ब-याच अवधीपासून भारतीय संघात नसूनही त्याच्यासाठी ऐवढी बोली लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने श्रीलंकेचा कर्णधार आणि अष्टपैली खेळाडू अँजेलो मॅथ्यूजलाही ७.५० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. मॅथ्यूज हा यंदाच्या पर्वातील तिसरा महागडा खेळाडू ठरला.  
युवराज आणि मॅथ्यूजच्या बोलीत दिल्लीने बाजी मारल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या दिनेश कार्तिकला १० कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. युवराजनंतर दिनेश कार्तिक हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याला गेल्या वर्षीपेक्षा कमी दरात खरेदी करण्यात आले. गेल्या वर्षी दिल्लीने दिनेश कार्तिकसाठी तब्बल साडे बारा कोटी रुपये मोजले होते. गेल्या वर्षी ९ कोटी रुपयांमध्ये खरेदी झालेल्या केविन पीटरसनला यंदा फक्त दोन कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले. पीटरसनला हैद्राबाद सनरायझर्सने त्याला खरेदी केले. याशिवाय मुरली विजयला किंग्स इलेव्हन पंजाबने तीन कोटी रुपये, फिरकी गोलंदाज अमित मिश्राला दिल्लीने साडे तीन कोटी रुपये, ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचला मुंबई इंडियन्सने ३ कोटी २० लाख रुपयांना खरेद केले. हैद्राबादने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला दीड कोटी आणि न्यूझीलंडच्या केन विल्यिम्सनला ६० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. 
श्रीलंकेच्या महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमला यांच्यावर कोणीही बोली न लावल्याने त्यांचा लिलाव झाला नाही. 

Web Title: Yuvraj Singh is the most expensive player in IPL-8