भारतासाठी पदक जिंकल्याचा अभिमान - राहुल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:18 AM2019-09-23T03:18:52+5:302019-09-23T03:19:10+5:30

महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने व्यक्त केल्या भावना

Rahul proud of winning medal for India | भारतासाठी पदक जिंकल्याचा अभिमान - राहुल

भारतासाठी पदक जिंकल्याचा अभिमान - राहुल

Next

- जयंत कुलकर्णी 

औरंगाबाद : ‘जागतिक कुस्ती स्पर्धेत देशाला कांस्यपदक जिंकून दिल्याचा मला अभिमान आहे. अजूनही मला २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची आशा आहे. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक मी माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांना समर्पित करतो,’ अशी भावना महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने रविवारी कझाकिस्तानच्या नूर सुलतान येथून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. यंदाच राहुलचा ‘लोकमत’च्या वतीने ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

राहुलच्या कारकीर्दीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी ठरली. या कमागिरीनंतर लगेच त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. राहुल म्हणाला, ‘जागतिक स्पर्धेत मी पदक जिंकले. आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्याने मी नशीबवान आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला मराठमोळा मल्ल बनणे आणि देशसाठी पदक जिंकणे यापेक्षा दुसरा कोणताच आनंद नाही. खरे तर मी सुवर्णपदकासाठी खेळायला हवे होते. कझाकिस्तानचा मल्ल आर. कलियेव्हविरुद्ध मी अखेरच्या काही सेकंदांत आक्रमक पवित्रा घेतला. पण याचा त्याला फायदा झाला. अखेरच्या काही सेकंदात कुस्ती गमावली नसती, तर मी अंतिम फेरीत खेळलो असतो.’

कांस्य लढतीतील दबावाविषयी राहुल म्हणाला, ‘कांस्य पदकाच्या लढतीत उतरताना पदक जिंकण्याचा दबाव होता; परंतु मॅटवर उतरल्यानंतर मला जिंकण्याची ऊर्जा आपोआपच मिळाली.माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार व कुस्तीप्रेमी या सर्वांच्या आशीर्वादाने मी पदक जिंकण्यात यशस्वी ठरलो. याआधीही २०१३ मध्ये मी ली ग्राफविरुद्ध खेळलो होतो. त्या लढतीचा अनुभव आजच्या सामन्यात माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला.’’

जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदक जिंकूनही आज आॅलिम्पिकसाठी पात्र ठरता न आल्याची खंत राहुलला वाटत नाही. तो म्हणाला, ‘माझ्या गुरूंचे स्वप्न आॅलिम्पिक आहे. त्यामुळे मी त्याची आशा अद्यापही सोडली नाही. जोपर्यंत तंदुरुस्त राहील तोपर्यंत मी देशासाठी खेळत राहणार आहे. आॅलिम्पिकच माझे स्वप्न आहे. तथापि, आता मी आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून देऊ शकतो, अशी माझी ओळख निर्माण झाल्याचे समाधान मला वाटते.’ तसेच, ‘राहुलने जागतिक कांस्य पदक जिंकून बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण केल्या,’ अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल बाळासाहेब आवारे यांनी दिली.

Web Title: Rahul proud of winning medal for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.