नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 20:55 IST2025-07-13T20:53:15+5:302025-07-13T20:55:25+5:30
Neeraj Chopra vs Arshad Nadeem: पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर दोघे पहिल्यांदाच आमने-सामने येतील.

नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
Neeraj Chopra vs Arshad Nadeem: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर ७ मे रोजी भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, त्याचा क्रीडा क्षेत्रावरही परिणाम दिसून येतोय. या सर्वांमध्ये, चाहत्यांना लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठी लढत पाहायला मिळणार आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर आता पुन्हा एकदा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम आमनेसामने येणार आहेत.
नीरज-अर्शद भिडणार
नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम सिलेसिया डायमंड लीग २०२५ मध्ये एकमेकांना भिडतील. ही स्पर्धा १६ ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये होणार आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर या दोन्ही दिग्गजांमध्ये होणारा हा सामना पहिलाच असेल. गेल्या वेळी पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये नदीमने ९२.९७ मीटर थ्रो करून सुवर्णपदक जिंकले होते, तर नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आता चाहते पुन्हा एकदा या दोन्ही दिग्गजांमधील रोमांचक स्पर्धेची वाट पाहत आहेत.
सिलेसिया डायमंड लीग २०२५ ची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु आयोजकांनी पुष्टी केली आहे की, दोन्ही खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. नीरज चोप्राने या वर्षी चांगली सुरुवात केली आहे. त्याने दोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर थ्रो करून दुसरे स्थान पटकावले. हा थ्रो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. याशिवाय, त्याने पॅरिस डायमंड लीग २०२५ मध्ये ८८.१६ मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले.
आतापर्यंत १० वेळा आमनेसामने
नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांनी आतापर्यंत १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना अनेक वेळा आव्हान दिले असून, प्रत्येक वेळी ही लढत चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरली आहे. विशेष म्हणजे, अर्शद नदीम फक्त एकदाच नीरज चोप्राला हरवू शकला आहे. अशा परिस्थितीत, सिलेसिया डायमंड लीगमधील ही लढत दोन्ही खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.