नजम सेठी यांची उमेदवारी मागे

By Admin | Updated: June 2, 2015 01:06 IST2015-06-02T01:06:44+5:302015-06-02T01:06:44+5:30

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी सोमवारी आयसीसीच्या अध्यक्षपदाची आपली उमेदवारी मागे घेतली आणि या पदासाठी

Najam Sethi behind the candidacy | नजम सेठी यांची उमेदवारी मागे

नजम सेठी यांची उमेदवारी मागे

कराची : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी सोमवारी आयसीसीच्या अध्यक्षपदाची आपली उमेदवारी मागे घेतली आणि या पदासाठी एखाद्या महान क्रिकेटपटूला नामांकित करण्याचा आग्रह पीसीबीला केला आहे.
याविषयी आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांना त्यांनी पत्र लिहिले. त्यात सेठी म्हणतात, ‘पुढील वर्षी आयसीसीचे अध्यक्षपद हे फक्त आयकॉन टेस्ट क्रिकेटपटूंसाठी असणार आहे. याची घोषणा आयसीसीने केली आहे. ते सदस्य मंडळ नामांकित करतील. त्यामुळे हा नियम तत्काळ लागू करावा आणि पाकिस्तानच्या महान आयकॉन क्रिकेटरला हा सन्मान मिळावा. या परिस्थितीत मी अध्यक्षपदाचे आपले नामांकन तत्काळ मागे घेत आहे आणि पीसीबीचा बोर्ड आॅफ गव्हर्नर्सला माझ्या जागी पाकिस्तानच्या महान माजी कसोटीपटूला नामांकित करावे, असा आग्रह करीत आहे.’
सेठी म्हणाले, ‘‘माझ्या या उशिरा घेतलेल्या निर्णयाने आणि त्यामुळे निर्माण झालेल्या असुविधेसाठी मी आयसीसीची माफी मागतो; परंतु ज्या भावनेने मी निर्णय घेतला आहे, त्या भावनेची आयसीसीचे सर्व सदस्य प्रशंसा करतील, असा मला विश्वास वाटतो.’’ सेठी या महिन्यात बार्बाडोसमधील आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीदरम्यान अध्यक्ष बनणार होते. ते बांगलादेशाचे मुस्तफा कमाल यांची जागा घेणार होते. श्रीनिवासन यांच्या मतभेदानंतर मुस्तफा कमाल यांनी राजीनामा दिला होता. पीसीबी सूत्रांनुसार बोर्ड आता सेठी यांच्या जागी अनेक माजी कसोटी कर्णधारांच्या नावांचा विचार करीत आहे. सूत्रांनुसार सध्या माजीद खान आणि झहीर अब्बास हे प्रबळ दावेदार मानले जातात. या पदाचा स्वीकार करण्यासाठी रमीझ राजा यांनाही आमंत्रित करण्याची चर्चा सुरू आहे; परंतु ते अनेक मीडियाशी कटिबद्ध झालेले आहेत. सेठी यांनी अंतिम क्षणी नामांकन मागे घेतल्यानंतर पीसीबी नेतृत्वातही बदल होऊ शकतो, असा युक्तिवाद सुरू आहे. सध्या शहरयार खान बोर्डाचे प्रमुख आहेत; परंतु सेठी यांच्याकडे भविष्यात पुन्हा पीसीबीच्या प्रमुखासाठी सर्वांत प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Najam Sethi behind the candidacy