नदाल, जोकोवीच, सेरेना तिसऱ्या फेरीत

By Admin | Updated: May 29, 2015 01:41 IST2015-05-29T01:41:36+5:302015-05-29T01:41:36+5:30

अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चेक रिपब्लिकन्सची पेट्रा क्विटोवा यांनी अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटाची तिसरी फेरी गाठली.

Nadal, Djokovic, Serena third round | नदाल, जोकोवीच, सेरेना तिसऱ्या फेरीत

नदाल, जोकोवीच, सेरेना तिसऱ्या फेरीत

पॅरिस : अव्वल खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चेक रिपब्लिकन्सची पेट्रा क्विटोवा यांनी अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला गटाची तिसरी फेरी गाठली. मात्र यासाठी त्यांना तीन सेटपर्यंत चांगलेच झुंजावे लागले. त्याचवेळी पुरुष गटात मात्र सहाव्या मानांकीत क्ले कोर्टचा बादशाह स्पेनच्या राफेल नदाल, नोवाक जोकोवीचने आपल्या लौकिकानुसार दिमाखात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सेरेनाने चांगली सुरुवात केल्यानंतरही तीला जर्मनीच्या अ‍ॅना-लेना फ्रेडसम विरुध्द पहिला सेट ५-७ असा गमवावा लागला. यानंतर मात्र तीने आपला हिसका दाखवत अ‍ॅनाला कोणतीही संधी न देता सलग दोन सेट जिंकले व ५-७, ६-३, ६-३ असा झुंजार विजय मिळवला. दुसऱ्या बाजूला चौथ्या मानांकित पेट्राला देखील झुंजावे लागले.
स्पेनच्या सिल्वीया सोलर-स्पिनोसा विरुध्द पहिला सेट टायब्रेकमध्ये ६-७(४-७) असा गमावल्यानंतर पेट्राने जबरदस्त पुनरागमन करताना सिल्वियाचा ६-७(४-७), ६-४, ६-२ असा धुव्वा उडवला.त्यामानाने पुरुष गटात बलाढ्य नदालने सहज आगेकूच केली. एकतर्फी झालेल्या सामन्यात नदालने आक्रमक खेळाच्या जोरावर आपल्याच देशाच्या निकोलस अलमाग्रोचा ६-४, ६-३, ६-१ असा फडशा पाडला. पुरूष एकेरीत अव्वल मानांकीत नोवाक जोकोवीचने लॅक्समबर्गच्या जाईल्स मुलेर ६-१, ६-४, ६-४ असे नमवित यावर्षाचा सलग २४ वा विजय नोंदविला. दुसऱ्या एका पुरूषांच्या एकेरी लढतीत ब्रिटनच्या अँडी मुरेने पोर्तुगालच्या जोओ सोउसाचा ६-२, ४-६, ६-४, ६-१ असा पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Web Title: Nadal, Djokovic, Serena third round