नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने देशाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद 'खेलरत्न'साठी हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा खेळाडू प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस केली आहे. या पुरस्कारासाठी २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरचे नाव नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.
मनूचे वडील राम किशन यांनी तर संताप व्यक्त करताना 'मुलीला नेमबाज का बनवले,' असा सवाल स्वतःला केला. त्यानंतर राजकारणही तापले. यावर स्वतः मनूने मौन सोडले. मनू म्हणाली, 'क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'खेलरत्न'साठी माझ्या नामांकनावरून सुरू झालेल्या वादासंदर्भात मी हे सांगू इच्छिते की, एक खेळाडू म्हणून माझे कर्तव्य माझ्या देशासाठी खेळणे आणि सर्वोत्तम कामगिरी करणे हे आहे. पुरस्कार आणि सन्मान हे प्रेरणा देतात, पण ते माझे अंतिम ध्येय नाही.
क्रीडा मंत्रालयाची बाजू
क्रीडा मंत्रालयानुसार ही केवळ शिफारस आहे, अंतिम निर्णय झालेला नाही. 'मनूने सांगितले की तिने पोर्टलवर अर्ज केला आहे. असे असेल, तर समितीने तिच्या नावाचा विचार करायला हवा. महासंघाने क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करायला हवी. तिचे नाव पुरस्काराच्या यादीत समावेश करून घेण्याची विनंती करायला हवी,' असे सूत्राने सांगितले.
अर्ज करताना माझ्याकडून चूक झाली असावी असे मला वाटते. ती चूक दुरुस्त केली जात आहे. पुरस्काराची पर्वा न करता मी देशासाठी आणखी पदके जिंकण्यासाठी प्रेरणा घेत राहीन. सर्वांना विनंती करते की, या विषयावर अधिक तर्कवितर्क मांडू नका.
मनूला खेळाडू बनवायलाच नको होते?
एका मुलाखतीत मनू भाकरचे वडील रामकिशन यांनी क्रीडा मंत्रालय आणि समितीवर टीका केली. ते म्हणाले, मुलीला नेमबाज बनवले याची मला खंत वाटते. मी तिला क्रिकेटपटू बनवायला हवे होते. मग, पुरस्कार व सन्मान सहज मिळाला असता. एका ऑलिम्पिकमध्ये दोन दोन पदकं जिंकली, आणखी काय करायला हवे होते? सरकारने तिच्या कामगिरीची दखल घ्यायला हवी. ती प्रचंड निराश झाली. मला सांगितले की, 'मी ऑलिम्पिकमध्ये जाऊन देशासाठी पदके जिंकायला नको होती का? खरे तर मी खेळाडू बनायला नको होते?'
एनआरएआय, क्रीडा मंत्रालय जबाबदार
मनी भाकरचे प्रशिक्षक आणि माजी नेमबाज जसपाल राणा यांनी मनूकडे दुर्लक्ष केल्याबद्दल क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय रायफल महासंघाला दोष दिला. ते म्हणाले, 'सरकारी यंत्रणा म्हणते की मनूने अर्ज केला नाही. माझ्या मते तिला अर्ज करण्याची गरज नाही. तिचे नाव स्वतःहून पुढे यायला हवे. मनू कोण आहे, तिची कामगिरी काय, हे अधिकाऱ्यांना माहीत नाही का? चुकीचा पायंडा पडला की खेळाडूंचे मनोबल खच्ची होते. पुरस्कारासाठी खेळडूंकडून थेट अर्ज मागविणे खेळाच्या हिताचे नाही. कामगिरीची दखल घेत पुरस्कार देण्याची व्यवस्था व्हायला हवी. क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण किंवा राष्ट्रीय क्रीडा महासंघाने यात पुढाकार का घेऊ नये.'