विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने जिंकले सुवर्ण, भारतीय संघाचे १००% वर्चस्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 04:53 PM2022-10-11T16:53:35+5:302022-10-11T16:54:45+5:30

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने सुवर्ण पदक जिंकले आहे.  

Maharashtra's Sandeep Dive has won the gold medal in the World Championship Carrom event   | विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने जिंकले सुवर्ण, भारतीय संघाचे १००% वर्चस्व!

विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने जिंकले सुवर्ण, भारतीय संघाचे १००% वर्चस्व!

googlenewsNext

नवी दिल्ली : ८वी  विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धा डी बॅरॉन रिसॉर्ट, लंगकावी, मलेशिया येथे ३ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान संपन्न झाली. भारतीय संघाकडून प्रथमच विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्रातील संदीप दिवेने या स्पर्धेतील पुरुष एकेरी गटात भारतीय संघाकडून खेळणाऱ्या राष्ट्रीय विजेत्या अब्दुल रेहमानला अंतिम सामन्यात अत्यंत अटीतटीच्या लढतीत १-२५, २५-१९ व २५-२२ असे पराभूत करून सुवर्ण पदक पटकाविण्याचा मान मिळविला. यापूर्वी २०१६ मध्ये भारताच्या प्रशांत मोरेने यु. के. येथे असाच विक्रम केला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारताच्या के. श्रीनिवासने भारताच्या फार्मात असलेल्या विश्व विजेत्या प्रशांत मोरेवर २५-१२, २५-२० असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून कांस्य पदक मिळविले. 
                   
तर महिलांच्या एकेरीत भारताच्या रश्मी कुमारीने अंतिम सामन्यात भारताच्या राष्ट्रीय विजेत्या व महाराष्ट्रातील काजल कुमारीला २५-२०, २५-१६ असे पराभूत करून तिसऱ्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. भारतीय संघाकडून प्रथमच खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या नीलम घोडकेने कांस्य पदक मिळविताना भारताच्याच देबजानी तामूलीला २५-२१, २५-७ असे हरविले.

पुरुष सांघिक गटाने पटकावले सुवर्ण 
पुरुष सांघिक गटात भारताने श्रीलंकेवर ३-० असा सहज विजय मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. भारताच्या प्रशांत मोरेने माजी विश्व विजेत्या निशांता फेर्नांडोला २५-१५, २५-१४ असे तर भारताच्या के. श्रीनिवासने शाहिद हिलमीला २५-४, २५-९ असे पराभूत केले. दुहेरीत भारताच्या संदीप दिवे व अब्दुल रेहमान जोडीने श्रीलंकेच्या उद्देश परेरा व सुरज फर्नांडो जोडीवर २५-०, २५-१५ असा एकतर्फी विजय मिळविळा. श्रीलंकेने रौप्य पदक मिळविले. तिसऱ्या क्रमांकासाठी मालदीवजने बांगलादेशवर २-१ असा विजय मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. 

भारतीय खेळाडूंनी अमेरिकेला लोळवलं
महिला संघाने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरताना अमेरिकेचा ३-० असा फडशा पाडला. भारताच्या नीलम घोडकेने अमेरिकेच्या पूजा राठीला २५-०, २५-० असे नमविले. तर दुसरीकडे फार्मात असलेल्या रश्मी कुमारीने अमेरिकेच्या प्रिती झकोटियाला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २५-४, १३-२५ व २५-१४ असे हरविले. दुहेरीत भारताच्या काजल कुमारी व देबजानी तामूली जोडीने अमेरिकेच्या उमा मुनगाला व तेजस्वी दुडुकाला २५-९, २५-० असे हरविले. कॅरमच्या इतिहासात अमेरिकेने प्रथमच रौप्य पदकाची कमाई केली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत श्रीलंकेने बांगलादेशवर ३-० असा सहज विजय मिळवून कांस्य पदक पटकाविले. 

पुरुष दुहेरीत भारताच्या प्रशांत मोरे व अब्दुल रेहमान जोडीने अंतिम सामन्यात भारताच्या के. श्रीनिवास व संदीप दिवे जोडीवर ०-२५, २५-२३ व २५-१५ असा निसटता विजय मिळविला. भारताने अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक मिळविले.तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत श्रीलंकेच्या निशांता फर्नांडो व शाहीद हिलमी जोडीने बांगला देशच्या हाफिझूर रेहमान व अब्दुल खलाक जोडीवर १७-२५, २५-०७, २५-१३ असा विजय मिळविला. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या रश्मी कुमारी व नीलम घोडके जोडीने भारताच्याच काजल कुमारी व देबजानी तामूलीला २५-८, २५-० असे सहज पराभूत करून विजयावर शिक्कामोर्तब केला. या गटात भारताने सुवर्ण व रौप्य पदक मिळविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अमीनाथ विधाध व ऐशाथ फैनाझ  जोडीने श्रीलंकेच्या रेबेका डार्लिन व मधुवंती जोडीवर ३-२३, २५-४ व २५-२१ अशी निसटती मात केली. 

१८ देशांनी घेतला होता सहभाग 
स्विस लीग गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील महम्मद घुफ्रानने ८ सामने सलग जिंकत १६ गुण मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली. तर प्रत्येकी १४ गुण मिळविलेल्या यु. ए. इ. चा सुफियान चिकतेने रौप्य पदक तर श्रीलंकेच्या शाहिद हिलमीने कांस्य पदक पटकाविले. यजमान मलेशियासाहित भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदिवज, यु,के. अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, पोलंड, साऊथ कोरिया, फ्रान्स, यु. ए. ई, सिंगापूर, सर्बिया, कतार, इटली अशा एकूण १८ देशांनी सहभाग या स्पर्धेत भाग घेतला होता.

 

Web Title: Maharashtra's Sandeep Dive has won the gold medal in the World Championship Carrom event  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.