Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:06 IST2024-07-08T18:04:57+5:302024-07-08T18:06:26+5:30
मराठमोळ्या अविनाश साबळेने रविवारी त्याचाच विक्रम मोडत ऐतिहासिक कामगिरी केली.

Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
Paris Diamond League : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवणाऱ्या मराठमोळ्या अविनाश साबळेने रविवारी त्याचाच विक्रम मोडत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने डायमंड लीगमध्ये स्टीपल चेस प्रकारात केवळ ८ मिनिटे आणि ९.९१ सेकंदात अंतर गाठत ३००० मीटरच्या शर्यतीत सहावे स्थान पटकावले. यासह त्याने राष्ट्रीय विक्रम करताना त्याचा जुना विक्रम मोडला. खरे तर अविनाशने २०२२ मध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता, जेव्हा तो ८.११.२० सेंकदात ३ हजार मीटर धावला होता. यावेळी त्याने १.५ सेकंदांचा कमी वेळ घेत हे अंतर पार केले.
इथिओपियाचा अब्राहम सिम आणि केनियाचा आमोस सेरेम यांनी ८.०२.३६ या वेळेत अंतर गाठून अव्वल स्थान गाठले. तर केनियाच्या अब्राहम किबिवोटने ८.०६.७० वेळेसह तिसरे स्थान पटकावले. मूळचा बीड जिल्ह्यातील असलेल्या अविनाश साबळेने दोन वर्षांपूर्वी बर्मिंगहॅम येथे २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम केला होता. त्याने दहाव्यांदा राष्ट्रीय विक्रम करण्याची किमया साधली आहे.
दरम्यान, अविनाश १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियन आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने ॲथलीट होण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातीलबीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.