आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:08 IST2025-10-27T09:08:12+5:302025-10-27T09:08:45+5:30
रोहिणी कलम या आष्टा येथील एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच म्हणून कार्यरत होत्या आणि शनिवारीच त्या देवास येथील आपल्या घरी परतल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
देवास : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुजित्सू खेळाडू आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षक रोहिणी कलम (वय ३५) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवास (मध्य प्रदेश) येथे घडली आहे. अर्जुन नगर राधागंज येथील रहिवासी असलेल्या रोहिणी यांचा मृतदेह त्यांच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे क्रीडा जगतात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कलम या आष्टा येथील एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच म्हणून कार्यरत होत्या आणि शनिवारीच त्या देवास येथील आपल्या घरी परतल्या होत्या. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी त्यांची दिनचर्या पूर्णपणे सामान्य होती. नाश्ता केल्यानंतर त्यांना एक फोन आला, त्यानंतर त्या आपल्या खोलीत गेल्या आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. खूप वेळ झाला तरी त्या बाहेर न आल्याने त्यांच्या धाकट्या बहिणीने लोखंडी सळीच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा रोहिणी यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. तातडीने बीएनपी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट; गेल्या वर्षी जिंकले होते कांस्यपदक
रोहिणी कलम यांनी गेल्या वर्षी अबू धाबी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय जुजित्सू स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाचे नाव उंचावले होते. काही काळापूर्वी त्यांच्या पोटातील गाठीवर शस्त्रक्रियाही झाली होती, अशी माहिती मिळत आहे.
रोहिणी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरलेल्या या खेळाडूच्या अचानक झालेल्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.