रिओमध्ये यश मिळविण्यासाठी चांगली सुरुवात महत्त्वाची

By Admin | Updated: May 3, 2016 03:49 IST2016-05-03T03:49:27+5:302016-05-03T03:49:27+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केले. आॅलिम्पिकमध्ये

A good start is important for success in Rio | रिओमध्ये यश मिळविण्यासाठी चांगली सुरुवात महत्त्वाची

रिओमध्ये यश मिळविण्यासाठी चांगली सुरुवात महत्त्वाची

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केले. आॅलिम्पिकमध्ये सलामीच्या लढतीत भारताला आयर्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
श्रीजेश म्हणाला, ‘‘आम्ही एका वेळी एकाच लढतीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. साखळी फेरीत जास्तीत जास्त सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या संघांत अव्वल चारमध्ये स्थान मिळवता येईल.’’
श्रीजेश पुढे म्हणाला, ‘‘आयर्लंडविरुद्ध सलामीच्या लढतीत कडवे आव्हान राहील. कारण २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळलेलो नाही. आमची तयारी बघता रिओमध्ये आम्ही अव्वल संघात स्थान मिळवू, अशी आशा आहे.’’
संघाच्या तयारीबाबत श्रीजेश म्हणाला, ‘‘सुरुवातीला आमच्याकडून अनेक टाळण्याजोग्या चुका होत होत्या. आता मात्र आम्ही त्यात सुधारणा केली आहे. आम्ही नवी रणनीती आखत असून, तिचा वापर आगामी स्पर्धेत करणार आहोत. आम्ही रोज दोनदा सराव करतो. मी गोलकीपर डेव्ह स्टेनिफोर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सत्रांत सराव करतो. आम्ही सकाळच्या सत्रात पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्टसोबत सराव करतो.’’
लंडन आॅलिम्पिकमध्ये १२व्या व अखेरच्या स्थानावर राहिलेला संघाचा सदस्य असलेला श्रीजेश म्हणाला, ‘‘आॅलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्याचे काय महत्त्व आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित
केले आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: A good start is important for success in Rio