चिली पेनल्टी शूटआऊटमध्ये चॅम्पियन, मेस्सीचे स्वप्न भंगले

By Admin | Updated: July 6, 2015 01:35 IST2015-07-06T01:35:55+5:302015-07-06T01:35:55+5:30

चिलीने अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची आपली ९९ वर्षांची प्रतीक्षा संपवली.

Chile penalty shootout champion, Messi dream breaks | चिली पेनल्टी शूटआऊटमध्ये चॅम्पियन, मेस्सीचे स्वप्न भंगले

चिली पेनल्टी शूटआऊटमध्ये चॅम्पियन, मेस्सीचे स्वप्न भंगले


सँटियागो : चिलीने अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची आपली ९९ वर्षांची प्रतीक्षा संपवली. त्यामुळे लिओनेल मेस्सीला सलग दुसऱ्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या फायनलमध्ये निराशेचा सामना करावा लागला.
आर्सेनलचा स्टार अलेक्सिस सांचेजने चिलीकडून विजयी गोल केला. दोन्ही संघ निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये यजमान चिलीने ४-१ अशी बाजी मारली.
सांचेजने सर्जियो रोमेरो याला चकवताना पेनल्टीवर निर्णायक गोल करताच एस्टेडियातील उपस्थित ४५ हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
चिलीने शूटआऊटमध्ये आपले पूर्ण नियंत्रण ठेवले. अर्जेंटिनाचा गोंजालो हिगुएनचा फटका क्रॉस बारच्या बाहेर निघून गेला, तर चिलीचा गोलरक्षक क्वाडियो ब्राव्होने बेनेगाचा शॉट रोखला होता. अशा प्रकारे अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीचा २२ वर्षांत आपल्या संघाला पहिले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. दुसरीकडे चिलीने कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनावर पहिलाच विजय नोंदवला.
चिलीचा स्टार अर्तुरो विडाल म्हणाला, ‘‘हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. आम्ही यासाठी कठोर मेहनत घेतली होती.’’ गेल्या वर्षी वर्ल्डकपमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये बाहेर झाल्यानंतर आमचा संघ कोपा अमेरिका जिंकण्यासाठी कटिबद्ध होता, असे सांचेजने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Chile penalty shootout champion, Messi dream breaks