बेल्जियम बाद फेरीत

By Admin | Updated: June 23, 2014 04:56 IST2014-06-23T04:56:26+5:302014-06-23T04:56:26+5:30

युवा फॉरवर्ड डिव्होक ओरिजीने प्रशिक्षक मार्क व्हिलमोट््सचा दुसऱ्या सत्रात मैदानात उतरविण्याचा निर्णय सार्थ ठरवित ८८ व्या मिनिटाला गोल नोंदविला.

Belgian in the next round | बेल्जियम बाद फेरीत

बेल्जियम बाद फेरीत

रिओ दि जनेरिओ : युवा फॉरवर्ड डिव्होक ओरिजीने प्रशिक्षक मार्क व्हिलमोट््सचा दुसऱ्या सत्रात मैदानात उतरविण्याचा निर्णय सार्थ ठरवित ८८ व्या मिनिटाला गोल नोंदविला. ओरिजीचा गोल निर्णायक ठरला आणि बेल्जियमने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत रशियाचा १-० ने पराभव करीत फिफा विश्वकप स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश निश्चित केला. ही लढत रशियाचे प्रशिक्षक फॅबियो कापेलो यांनी गाजविली, पण अखेर बेल्जियमने सरशी साधली.
या विजयासह बेल्जियमने दोन सामन्यांत ६ गुणांची कमाई करीत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. रशियाला आता बाद फेरी गाठण्यासाठी अल्जेरियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवावा लागेल आणि अन्य सामन्यांचे निकाल अनुकुल ठरतील यासाठी ईश्वराची प्रार्थना करावी
लागेल. ‘रेड डेव्हिल्स’ बेल्जियम संघासाठी प्रशिक्षक फॅबियो कापेलो यांच्या रशियन संघाचा बचाव भेदणे अडचणीचे ठरत होते, पण अखेर बेल्जियमने सरशी साधली. निर्धारित वेळेच्या दोन मिनिटांपूर्वी मिडफिल्डर इडेन हजार्डच्या मदतीने ओरिजीने शानदार गोल नोंदवित संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. १९ वर्षीय ओरिजी बेल्जियमतर्फे विश्वकप स्पर्धेत गोल नोंदविणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला तर स्पर्धेच्या इतिहासात अंतिम क्षणी गोल नोंदविणारा सातवा युवा फुटबॉलपटू ठरला. बेल्जियमने सलामी लढतीत अल्जेरियाचा २-१ ने पराभव केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Belgian in the next round